loader
Foto

नेपाळलाही चीनचा दणका; संपूर्ण गावच ताब्यात घेतले!

काठमांडू: भारताच्या कालापानी, लिपुलेखा भागावर दावा ठोकणाऱ्या नेपाळला चीनने जोरदार झटका दिला आहे. भारताविरोधात आगळीक करणाऱ्या नेपाळच्या एका गावाचा चीनने ताबा घेतला असल्याचे समोर आले आहे. चीनच्या या कृत्यावर नेपाळ सरकारने मौन धारण केले आहे.

मागील ६० वर्षांपासून नेपाळ सरकारच्या ताब्यात असणारे रुई गाव चीनच्या ताब्यात गेले असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. नेपाळी वृत्तपत्र अन्नपूर्णा पोस्टनुसार तीन वर्षांपूर्वी रुई गाव हे तिबेटच्या स्वायत्त क्षेत्राचा भाग झाला आहे. या गावात ७२ जणांची घरे आहेत. त्याशिवाय नेपाळच्या नकाशातही या गावाचा समावेश आहे. मात्र, या गावावर चीनने नियंत्रण आले आहे. या गावात सीमा दर्शवणारे खांबही चीनकडून हटवण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

नेपाळच्या गोरखा महसूल कार्यालयानुसार, या गावातून महसूल जमा केला असल्याची नोंद आहे. त्याशिवाय गावाबाबत अन्य नोंदीदेखील कार्यालयात उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नेपाळचे इतिहास तज्ञ रमेश धुंगल यांनी सांगितले की, वर्ष २०१७ पर्यंत रुई आणि तेईगा गाव हे गोरखा जिल्ह्यातील उत्तरी भागात आहेत. रुई गाव हे नेपाळचा भाग आहे. या गावाला आम्ही युद्धात कधी गमावले नाही. त्याशिवाय, तिबेटसोबत कोणत्याही करारातही हे गाव नव्हते. नेपाळने सीमा भाग दर्शवताना केलेल्या चुकीमुळे रुई आणि तेघा गावावरील ताबा गमावला असल्याचे त्यांनी सांगितले.
 

दरम्यान, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे नेपाळला या गावावरील ताबा गमवावा लागला असल्याचा आरोप चुमुबरी ग्रामीन नगरपालिकेचे स्थानिक नेते वीर बहादूर लामा यांनी केला आहे. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे समदो आणि रुई गावामध्ये सीमा दर्शवणारा स्तंभ लावण्यात आला. त्यामुळे हे गाव संपूर्णपणे चीनच्या अखत्यारीत आला. साम गाव, सामडो आणि रुई गावातील भाषा, संस्कृती आणि परंपरा एकच असल्याचे त्यांनी सांगितले.

नेपाळ सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या गावांचा ताबा चीनकडे गेला असल्याचा नेपाळी इतिहासकार धुंगेल यांनी सांगितले. उत्तर तिबेटच्या सीमेला लागून असलेल्या भागात नेपाळची परिस्थिती वाईट असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतासोबतचा सीमावादावर चर्चा होते. मात्र, चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर सरकार दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नेपाळने आपल्या नवीन नकाशात भारताच्या ३९५ चौकिमी भागावर दावा केला आहे. लिपिंयाधुरी, लिपुलेख, कालापानी यांसह, गुंजी, नाभी आणि कुटी गावांवरही दावा केला आहे. नवीन नकाशात कालापानी भागाच्या ६० चौकिमी भागावर नेपाळने दावा केला आहे. लिपुलेख भागात भारत, नेपाळ आणि चीनच्या सीमा एकत्र येतात. कैलास मानसरोवरच्या यात्रेकरूंसाठी हा मार्ग महत्त्वाचा असून वेळेची बचत करणारा आहे. भारताने या भागात रस्त्य्याचे बांधकाम केले. त्याला नेपाळने आक्षेप घेतला. मात्र, हे बांधकाम भारताच्या हद्दीतील भागात केले असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. नेपाळची ही कृती चीनच्या पाठिंब्यावरूनच सुरू असल्याची चर्चा आहे.

Recent Posts