loader
Foto

'अमेरिकेच्या निवडणुकीत मदत करा; ट्रम्प यांचे चीनला साकडे'

वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाच्या मुद्यावर चीनविरोधात रान उठवणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता अडचणीत आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी २०२० ची निवडणूक जिंकण्यासाठी चीनकडे मदत मागितली असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केला आहे. तर, बोल्ट यांचा दावा हा खोटा असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी आपल्या आगामी पुस्तकात अमेरिका आणि चीनच्या संबंधावर भाष्य केले आहे. बोल्टन यांच्या पुस्तकातील काही भाग द वॉल स्ट्रीट जर्नल, द वॉशिंग्टन पोस्ट आणि द न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. मागील वर्षी जून महिन्यात जपानमधील ओसोकामध्ये जी-२० राष्ट्रांची बैठक पार पडली होती. या बैठकी दरम्यान ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची बैठक झाली होती. या बैठकीत ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मदत करण्यासाठी गळ घातली. चीन आपल्या आर्थिक ताकदीच्या बळावर अमेरिकेतील निवडणूक प्रचारावर परिणाम करू शकतो असे ट्रम्प यांना वाटत असल्याचे बोल्ट यांनी सांगितले.

बोल्टन यांनी केलेल्या दाव्यानुसार, अमेरिकन शेतकऱ्यांच्या मुद्यावरही चर्चा झाली. चीनने सोयाबीन आणि गहू खरेदी केल्यास अमेरिकेच्या निवडणुकीत परिणाम होऊ शकतो, असेही ट्रम्प यांनी म्हटले असल्याचे बोल्ट यांनी सांगितले. त्याशिवाय व्यापार युद्ध संपवण्याचीही चर्चा ट्रम्प यांनी केली असल्याचा दावा बोल्ट यांनी केला आहे.

दरम्यान, बोल्टन यांनी केलेले दावे ट्र्म्प यांनी फेटाळून लावले आहेत. बोल्टन यांचे पुस्तक खोटे दावे आणि फेक न्यूजचे भांडार असल्याची सडकून टीका ट्रम्प यांनी केली. बोल्ट हे पदावर असताना माझ्याबद्दल चांगले बोलत होते. मात्र, त्यांना हटवल्यानंतर वाईट म्हणणे सुरुवात केली आहे. बोल्ट हे मुर्ख व्यक्ती असून त्यांना युद्ध घडवण्यात रस असल्याचाही आरोप ट्रम्प यांनी केला.

बोल्ट यांच्या दाव्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील आगामी निवडणुका लक्षात घेता ट्रम्प यांनी चीनवर आरोप करण्यास सुरुवात केली असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत होती. त्याशिवाय करोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यात ट्रम्प यांनी अपयश आल्यामुळे त्यांनी करोनाच्या मुद्यावर चीनवरच शरसंधान साधण्यास सुरुवात केली असल्याचाही आरोप करण्यात येत होता.

Recent Posts