loader
Foto

करोना: स्वस्तातील लसीची चाचणी सुरू; अमेरिकेतूनही चांगली बातमी

लंडन/बीजिंग/वॉशिंग्टन: जगभरात सुरू असलेल्या करोनाच्या थैमानाला अटकाव करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. करोनाच्या आजारावर मात करण्यासाठी अनेक देशांमध्ये लसींवर, औषधांवर संशोधन सुरू असून या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे चित्र आहे. ब्रिटनमध्ये सर्वात स्वस्त असलेल्या लसीची चाचणी करण्यात येणार आहे. तर, अमेरिका आणि चीनमधूनही चांगली बातमी समोर आली आहे.

द टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रिटनच्या इंपिरिअल कॉलेजने लस विकसित केली आहे. बुधवारपासून या लसीची चाचणी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. या लसीची चाचणी यशस्वी झाल्यास अवघ्या ३०० रुपयांमध्ये ही लस उपलब्ध होणार आहे. चाचणीच्या पहिल्या टप्प्यात १२० जणांना ही लस देण्यात येणार आहे. या लस संशोधनाचे प्रभारी प्रा. रॉबिन शटॉक यांनी सांगितले की, या लसीची किंमत अतिशय कमी ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ही लस स्वस्त दरात उपलब्ध झाल्यास ब्रिटनमधील सर्वच नागरिकांना याचा लाभ होईल.

या लस चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी झाल्यास दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहा हजार जणांना लस देण्यात येणार आहे. लस चाचणीच्या कार्यक्रमानुसार सर्वकाही वेळेवर घडल्यानंतरही ही लस २०२१ च्या पूर्वी उपलब्ध होणार नसल्याचेही प्रा. रॉबिन शटॉक यांनी सांगितले. मात्र, ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेली लस सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने विकसित केलेल्या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा जुलै महिन्यात सुरू होणार आहे. अमेरिकेतील मॉर्डर्ना थेराप्यूटिक्सची ही लस माणसांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवून करोनाच्या आजाराविरोधात लढण्यास मदत करणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत अमेरिकेतील ३० हजार नागरिकांना ही लस देण्यात येणार आहे. ही लस करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यास सक्षम आहे की नाही यावर संशोधन करण्यात येणार आहे. वर्ष २०२१ पर्यंत एक अब्ज लस तयार करण्याची तयारी केली असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
 

चीनच्या लस ९० टक्केजणांवर यशस्वी
चीनमधील सिनोवॅक बायोटेक कंपनीने लस चाचणी यशस्वी झाली असल्याचा दावा केला आहे. ही लस सुरक्षित असून कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. ही लस दिल्यानंतर १४ दिवसांमध्ये करोनाच्या विषाणूंचा खात्मा करणाऱ्या अॅण्टीबॉडीजची निर्मिती शरीरात होते. या लसीच्या चाचणीसाठी १८ ते ५९ दरम्यानच्या ७४३ आरोग्य स्वयंसेवकांनी आपली नोंदणी केली होती. पहिल्या टप्प्यात १४३ जणांचा पहिल्या टप्प्यात समावेश होता. तर, दुसऱ्या टप्प्यात ६०० जणांवर चाचणी करण्यात आली. या चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना लस देण्यात आली होती. सिनोवॅक कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ वेइदोंग यिन यांनी सांगितले की, पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीनुसार, ही लस सुरक्षित असून रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण होणे हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Recent Posts