loader
Foto

आता लष्करच कारवाई करणार; उत्तर कोरियाची दक्षिण कोरियाला धमकी

सेऊल: मागील काही वर्षांपासून दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये तणाव निवळलेला होता. दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारत असल्याचे आशादायी चित्र निर्माण होत असताना या संबंधात कटुता निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आणि सर्वेसर्वा किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंगने दक्षिण कोरियाला थेट युद्धाची धमकी दिली आहे.

मागील काही महिन्यांपासून दक्षिण कोरियाच्या हद्दीतून उत्तर कोरियाविरोधात संदेश देणारे फुगे सोडण्यात येत आहेत. उत्तर कोरियातून पळून आलेल्या नागरिकांकडून हे कृत्य केले जात असल्याचे म्हटले जाते. फुगे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी किम जोंग यांची बहीण किम यो जोंगने दक्षिण कोरियाकडे केली होती. मात्र, त्याकडे दक्षिण कोरियाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संतापलेल्या किम यो यांनी थेट युद्धाचीच धमकी दिली आहे. किम यो यांनी म्हटले की, आम्ही आता थेट कारवाईच करणार आहोत. आमचे सर्वोच्च नेते, आमचा पक्ष, देश आणि मिळालेल्या अधिकाराचा वापर करत मी सैन्याला शत्रूंवर कारवाईचा आदेश देत असल्याचे किम यो यांनी म्हटले आहे. या कारवाईबाबतचा अंतिम निर्णय आता लष्करप्रमुख घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण कोरियाबाबतच्या संबंधाचे निर्णय घेण्याबाबत किम यो यांची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे त्यांच्या या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

दरम्यान, उत्तर कोरियात सुरू असलेल्या अणवस्त्र कार्यक्रम आणि मानवाधिकाराच्या मुद्यावरून किम जोंग यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. किम यांच्या सत्तेला कंटाळलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात आश्रय घेतला आहे. हे कार्यकर्ते म्हणजे शत्रूंच्या भूमीवरील किडे असून त्यांनी मायदेशासोबत गद्दारी केली असून त्यांचे मालक असलेल्या दक्षिण कोरियाला धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचेही याआधी किम यो यांनी म्हटले होते. किम जोंग उननंतर उत्तर कोरियाच्या राजकारणावर किम यो यांचीच पकड असल्याचे म्हटले जाते. किम यांच्या अनेक निर्णयामागे किम यो यांची भूमिका असते.

Recent Posts