loader
Foto

करोनाच्या अटकावासाठी 'या' औषधांचा वापर? संशोधन सुरू

वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत असून औषध आणि लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, विविध आजारांवर असलेल्या उपलब्ध असलेल्या औषधांच्या वापराने करोनाच्या विषाणूवर मात करता येईल का, याबाबतही संशोधन सुरू आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी क्षयरोग आणि पोलिओ लसीच्या वापरावर संशोधन सुरू आहे.

'द वॉशिंग्टन पोस्ट' दिलेल्या वृत्तानुसार, क्षयरोगावरील लसीमुळे करोनाच्या विषाणूंचा प्रभाव कमी करता येईल का, याबाबत संशोधन सुरू आहे. टेक्सास ए अॅण्ड एम हेल्थ सायन्स सेंटरमधील रोगप्रतिकारक विज्ञानाचे प्राध्यापक जेफ्री डी सिरिलो यांनी सांगितले की, करोनाच्या व्हायरसला अटकाव करण्यासाठी सध्या हीच एकमेव लस असू शकते, त्यामुळे या लसीच्या वापराबाबत संशोधन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याशिवाय, संशोधकांच्या एका पथकाने कोविड-१९ च्या प्रभावाला कमी करण्यासाठी पोलिओच्या लसीचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या संशोधकांच्या पथकानुसार, आतापर्यंत पोलिओ आणि क्षयरोगासाठी वापरण्यात येणाऱ्या लसींचा वापर कोट्यवधी लोकांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-१९ चा नायनाट करण्याऐवजी लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


दरम्यान, जगभरातील ७५ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ४ लाख २० हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक २० लाख २० हजार नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. तर, एक लाख १३ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी काही लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आली असून येत्या काही महिन्यात लसीबाबत अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे.

Recent Posts