loader
Foto

डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' निर्णयामुळे भारतीयांना बसणार फटका!

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या भारतीय व इतर देशांतील नागरिकांना झटका देणारा निर्णय घेणार आहेत. 'एच१बी' व्हिसासहित नोकरी देणारे इतर व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय ट्रम्प घेणार असल्याचे वृत्त आहे. 'एच१बी' व्हिसाधारकांमध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. अमेरिकेत वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प हा निर्णय घेणार आहेत.

'द वॉल स्ट्रीट जर्नल'च्या वृत्तानुसार, अमेरिकन सरकार आगामी आर्थिक वर्षात या प्रस्तावाला मान्यता देऊ शकते. अमेरिकेत आर्थिक वर्ष एक ऑक्टोबरपासून सुरू होते. त्याचवेळी नवीन व्हिसा जारी करण्यात येतात. या निर्णयामुळे कोणत्याही नवीन एच१ बी व्हिसाधारकाला अमेरिकेत नोकरी करण्यास मनाई असणार आहे. व्हिसा निलंबन करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतरच व्हिसाधारकांना नोकरी करता येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. एच१बी व्हिसा हा अमेरिकेतील कंपन्यांना परदेशातील नागरिकांना नोकरी करण्यास मान्यता देतो. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा मोठा वाटा आहे.

अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये भारत आणि चीनमधून हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी मिळते. विशेषत: भारतीय कर्मचाऱ्यांना अधिक मागणी असते. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे भारतीयांना मोठा धक्का बसणार आहे. करोनाच्या संकटामुळे याआधीच एच१बी व्हिसाधारकांना नोकरी गमवावी लागली आहे. अनेक भारतीय अमेरिकेतून मायदेशी परतले आहेत. अमेरिकेत एच१बी व्हिसावर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळत असल्याचेही एका अहवालात समोर आले होते. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत करोनाच्या संकटासह बेरोजगारीचाही प्रमुख मुद्दा होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ट्रम्प हा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा आहे.

Recent Posts