loader
Foto

बलुचिस्तान: लष्कराच्या इमारतीची नासधुस; पाक सैन्याने पळ काढला

इस्लामाबाद: पाकिस्तानमधील बलूच प्रांतातील बलूच बंडखोरांच्याविरोधात क्रूर मोहीम आखणाऱ्या पाकिस्तानच्या फौजांना लोकांच्या जोरदार विरोधानंतर पळ काढवा लागला. बलुचिस्तानमधील ब्राबचाह परिसरात बलुच नागरिकांनी पाकिस्तानी लष्कराविरोधात जोरदार आंदोलन करत दगडफेक केली. लोकांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा दलाच्या जवानांना चेक पोस्ट सोडून पळ काढवा लागला.

स्थानिक वृत्तानुसार, पाकिस्तान लष्कराच्या विरोधात झालेल्या आंदोलनात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला. बलुच नागरिकांनी जोरदार विरोध सुरू केल्यामुळे पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांना आपली पोस्ट सोडून पळ काढवा लागला. हिंसक झालेल्या या आंदोलनात आंदोलकांनी लष्कराची इमारत आणि वाहनांना आग लावली. पाकिस्तानच्या इराण सीमेवर बलुचिस्तानमध्ये बंडखोरांविरोधात मोठी मोहीम सुरू आहे. लष्कराच्या कारवाई काही निष्पाप नागरीक आणि लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्याशिवाय स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी या भागात जोर पकडत आहे.

 

अरब न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बलुचिस्तान बंडखोरांकडून होणाऱ्या हिंसक हल्ल्याविरोधात पाकिस्तान लष्कराने या भागात मोहीम सुरू केली आहे. मागील काही वर्षांपासून बंडखोरांविरोधात कारवाई करण्यात येत नसल्याचे आरोप-प्रत्यारोप पाकिस्तान-इराणमध्ये सुरू आहेत. बलुचिस्तानमध्ये बंडखोरांचे अनेक गट सक्रिय आहेत. फुटीरतावादी गटांकडून सातत्याने हिंसाचार घडवला जात असल्याचा दावा करण्यात येतो.

गुप्तचर खात्यातील एका अधिकाऱ्याने अरब न्यूजला सांगितले की, 'ग्राउंड झिरो क्लियरन्स ऑपरेशन' अंतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे. काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तान सरकारचे समर्थक नेते नवाबजादा जमाल खान रायसैनी यांनीदेखील याबाबत वक्तव्य केले होते. बलुच लिबरेशन आर्मी आणि बलुच लिबरेशन फ्रंट या गटांचा खात्मा करण्यासाठीच ही लष्करी मोहीम आखण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या मोहीमेत लष्कराने अनेक बलुच दहशतवाद्यांना ठार केले असून त्यांची ठिकाणे उद्धवस्त केले असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Recent Posts