loader
Foto

काय सांगता...मांजरीवरील औषधाने केला करोनाचा खात्मा!

बीजिंग: जगभरात करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी औषधे, लस विकसित करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ धडपड करत असताना एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मांजरीमधील संसर्गजन्य आजाराविरोधात वापरण्यात येणाऱ्या औषधामुळे करोनाला अटकाव करता येणार आहे. हे औषध तयार करणाऱ्या कंपनीने अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाकडे मानवावर या औषधाची चाचणी करण्याची परवानगी मागितली असताना ही सकारात्मक बातमी समोर आली आहे.

चीनमधील संशोधकांनी हा दावा केला आहे. मांजरीमधील संसर्गजन्य आजारासाठी GC376 हे औषध देण्यात येते. प्रयोगशाळेत झालेल्या चाचणीत अनुकूल परिणाम समोर आले आहेत. या संशोधनाचे नेतृत्व करणारे प्रा. झांग शुयांग यांनी संगणकीय मॉडेल आणि प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या परीक्षणाच्या आधारे सांगितले की, GC376 या औषधाचा परिणाम चांगला असल्याचे आढळले असून हे सुरक्षित औषध आहे. हे औषध Sars-CoV-2 च्या महत्त्वाच्या एन्झाइमला बांधून ठेवता. या एन्झाइममुळे करोनाचा संसर्ग होतो असे त्यांनी सांगतिले. या एन्झाइमला Mpro असे म्हणतात.

Mpro एन्झाइम प्रोटीनला तोडतात आणि व्हायरस या एमिनो अॅसिडचा वापर ब्लॉक्स तयार करण्यासाठी करतो. Mpro शिवाय, करोनाचा विषाणू आणखी व्हायरस तयार करू शकत नाही. हे औषध करोनाच्या विषाणूने बाधित असलेल्या पेशींपर्यंत सहजपणे पोहचू शकतात, असेही संशोधकांना आढळले आहे. हे औषध माणसांसाठी सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे.

GC376 हे औषध अमेरिकेतील Anivive Lifesciences कंपनीने तयार केले आहे. हे औषध मांजरीमधील संसर्गजन्य आजारांवर वापरण्यात येते. करोनाबाधित रुग्णांवर याचा वापर कधी करण्यात येणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. कंपनीने सांगितले की, सध्या अन्न व औषध प्रशासनासोबत त्यांची चर्चा सुरू आहे. करोनाचा संसर्ग मांजरींसाठीदेखील घातक असल्याचे या संशोधनात आढळले असल्याचे त्यांनी सांगितले.

Recent Posts