loader
Foto

मस्तच! ब्रिटनच्या करोना प्रतिबंधक लसीचे भारतात उत्पादन सुरू

लंडन: जगभरातील विविध देशांमध्ये करोनाला अटकाव करणारी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने संशोधित केलेल्या लसीची चाचणी सुरू असून एस्ट्राजेनेका कंपनी या लसीचे उत्पादन करणार आहे. या कंपनीकडून डोस उत्पादन सुरू झाले असून भारतातही लसी निर्मिती करण्यात येत आहे.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने करोनाच्या विषाणूला अटकाव करण्यासाठी AZD1222 ही लस विकसित केली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या या लसीचे उत्पादन एस्ट्राजेनेका ही औषध निर्मिती करणारी कंपनी करणार आहे. सध्या या लसीची चाचणी सुरू आहे. या लसीच्या पहिल्या टप्प्यात यश मिळाले आहे. सध्या मानवावर या लसीची चाचणी सुरू आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये मानवी चाचणीचे परिणाम समोर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी काही चाचण्या पूर्ण केल्यानंतर ही लस उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एस्ट्राजेनेकाने ब्रिटनबाहेर तीन देशांमध्ये लसीचे उत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. भारत, नॉर्वे आणि स्विर्त्झलंड या देशांमध्ये सध्या लस निर्मिती करण्यात येत असल्याचे वृत्त 'डेली मेल'ने दिले आहे.

चाचणी सुरू असतानाही लसीचे उत्पादन सुरू करणे हे आर्थिकदृष्ट्या धोक्याचे असल्याचे एस्ट्राजेनेका कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पास्कल सॉरिओट यांनी म्हटले आहे. ऑगस्टमध्ये चाचणीचे परिणाम अनुकूल न आल्यास लसीच्या उत्पादनावरील खर्च वाया जाण्याची भीती आहे. मात्र, चाचणीचे परिणाम सकारात्मक येतील असा विश्वास असून तातडीने लस उपलब्ध व्हावी यासाठी ही जोखीम पत्करली असल्याचे त्यांनी सांगितले.

मानवी चाचणी यशस्वी ठरल्यास एस्ट्राजेनेका कंपनी अमेरिकेत ४०० दशलक्ष आणि ब्रिटनमध्ये १०० दशलक्ष लसी देणार आहे. याबाबत करार करण्यात आला आहे. 'शक्य तितक्या लवकर' या तत्वावर ब्रिटनने लस देण्याची तयारी दर्शवली आहे. या लसीची १८ ते ५५ या वयोगटातील निरोगी व्यक्तींवर चाचणी झाली. आता दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात होणार आहे. या टप्प्यातील चाचणीमध्ये विविध वयोगटातील १० हजार २६० स्वयंसेवकांवर करोनाची चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये लहान बालके आणि वयस्कर नागरिकांचाही समावेश आहे.

Recent Posts