loader
Foto

अमेरिकेत वंशभेदविरोधी लढ्याला आता गुगलचे पाठबळ

वॉशिंग्टन: आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉइड याच्या हत्येनंतर अमेरिकेत उसळलेल्या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, वंशभेदाविरोधातील लढ्यासाठी ३७ दशलक्ष अमेरिकन डॉलरचे योगदान देण्याची घोषणा गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केली.

प्राण गमावलेल्या कृष्णवर्णीयांच्या स्मरणार्थ ८ मिनिटे ४६ सेकंद मौन पाळण्याचे आवाहनही पिचाई यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बुधवारी एका ईमेलद्वारे केले आहे. वंशभेदाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या संघटनांना १२ दशलक्ष डॉलरचा निधी देण्यात येईल, तसेच वांशिक न्यायासाठी लढणाऱ्या संघटनांच्या मदतीसाठी 'अॅड ग्रांट्स'च्या स्वरूपात २५ दशलक्ष डॉलर देण्यात येतील, अशी घोषणा पिचाई यांनी केली.

'आपला कृष्णवर्णीय समाज वेदनांचा सामना करत आहे. या परिस्थितीत आपल्यापैकी अनेक जण आपल्या तत्त्वांसाठी उभे राहण्यासाठी, एकतेचे दर्शन घडवण्यासाठी योग्य मार्गाचा शोध घेत आहेत. कंपनीकडून नेमके काय योगदान देता येईल, याबाबत काही कृष्णवर्णीय नेत्यांसोबत माझी चर्चा झाली. येत्या काळात नेमके कोठे आपली ऊर्जा आणि स्रोत यांचा वापर करायचा, यावर विचार सुरू आहे,' असे ४७ वर्षीय पिचाई यांनी या ईमेलमध्ये म्हटले आहे.

फ्लॉइड एप्रिलमध्ये पॉझिटिव्ह
जॉर्ज फ्लॉइड याच्या शवविच्छेदनाचा अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. फ्लॉइड हा ३ एप्रिल रोजी कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळला होता, मात्र त्याला कोणतीही लक्षणे नव्हती, असे यात समोर आले आहे. पोलिसाने मानेवर गुडघा दाबून धरलेला असताना फ्लॉइड याला हृदयविकाराचा धक्का आला, त्याचा मृत्यू ही हत्याच आहे, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

न्यूयॉर्क : आफ्रिकन-अमेरिकन नागरिकाच्या मानेवर गुडघा दाबून धरणारा पोलिस अधिकारी डेरेक चॉवीन हा या अटकेशी संबंधित असलेल्या चार पोलिसांमध्ये सर्वात वरिष्ठ होता. त्याच्या कामगिरीसाठी शौर्यपदके मिळाली होती, तसेच त्याच्याविरोधात १७ तक्रारीही होत्या. यामध्ये वेगाने गाडी चालवल्याप्रकरणात एका महिलेला गाडीबाहेर खेचल्याच्या तक्रारीचाही समावेश आहे.

ब्रूवर : आपले सोशल मीडिया अकाउंट हॅक करून त्यावरून वांशिक टिपण्णी केल्याचा दावा करणारे मेन या शहराचे उपमहापौर थॉमस मोरेली यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला असून त्यांच्यावर खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मोरेली यांनीच संबंधित प्रतिक्रिया लिहिल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले.

Recent Posts