loader
Foto

धक्कादायक! मास्क न घातल्याने पोलिसांची मारहाण; एकाचा मृत्यू

मेक्सिको: करोनाच्या संसर्गामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. काही देशांमध्ये लॉकडाउनचे नियम शिथील करण्यात येत असताना काही नियमही लागू करण्यात आले आहेत. मेक्सिकोमध्ये एका व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर लोकांनी आंदोलन करत पोलिसांच्या कारला आग लावली.

मेक्सिकोमधील गुआदालाजारा या शहरात गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. मीडिया रिपोर्टसनुसार, याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला. डी लॉस मेमब्रिलोस शहरात नगरपालिकेत पोलिसांनी एका ३० वर्षीय गियोवन्न लोपेझला ताब्यात घेतले होते. एका पिकअप ट्रकमध्ये पोलीस अधिकारी लोपेझला रायफलने मारहाण करत असल्याचे दृश्य दिसत होते. ही मारहाण सुरू असताना त्यावेळी उपस्थित असलेले काहीजणांनी त्याच्या सुटकेसाठी पोलिसांना साद घातली होती. लोपेझने मास्क घातले नव्हते. मास्क घालण्यास विरोध केला म्हणून पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली असल्याचा आरोप एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे. लोपेझच्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह एका सरकारी रुग्णालयात सापडला. बेदम मारहाणीत त्याच्या डोक्यावर तीव्र आघात झाल्यामुळे मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. स्थानिकांनी पोलिसांच्या कृत्याविरोधात आंदोलन केले. या दरम्यान, पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. 'द गार्डियन'च्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, गुआदालाजारामध्ये शासकीय इमारती बाहेर पोलीस अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांच्या गस्ती पथकातील वाहनाला आग लावण्यात आली. एका आंदोलकाने मोटरसायकलवर असलेल्या एका पोलिसाच्या पाठीवर ज्वलनशील पदार्थ टाकला आणि आग लावली. पोलिसांनी आंदोलकांना आवरण्यासाठी लाठीचार्ज करत अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या.

Recent Posts