loader
Foto

'भारत-चीन सीमेवरील स्थिती स्थिर; ट्रम्प यांची मध्यस्थी नकोच'

बीजिंग: भारताबरोबरील सीमेवरील परिस्थिती स्थिर असून, दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या दृष्टीने पूर्णवेळ यंत्रणा व संवादाची व्यवस्था आहे. त्यामुळे, सद्यस्थितीवर अन्य कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही, अशी भूमिका चीनने मांडली आहे.

लडाखमध्ये चीनच्या सैन्याने सीमोलंघ्घन केले असून, भारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेमध्ये सीमावादावर मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली होती. दोन्ही नेत्यांमधील या चर्चेवर चीनकडून प्रथमच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी मध्यस्थीची गरज नसल्याचे सांगितले. भारताबरोबरील सीमाप्रश्नावर चीनची भूमिका सातत्यपूर्ण आणि स्पष्ट आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये एकमत झालेल्या मुद्द्यांवरही दोन्ही देशांकडून अंमलबजावणी होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा प्रस्ताव भारतानेही फेटाळला आहे.

लडाखसह सिक्कीमध्येही दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले होते. चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील कुमक वाढवली आहे. या भागातून भारताने पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच, चीनकडून सीमावाद उकरून काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही देशांमध्ये २०१७मध्ये डोकलाम येथेही असाच वाद निर्माण झाला होता. तेथे दोन्ही देशांचे लष्कर ७३ दिवस आमनेसामने होते. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये अनौपचारिक चर्चा करण्याची गरज समोर आले होती आणि एप्रिल २०१८मध्ये वुहान येथे मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये पहिली अनौपचारिक परिषद झाली होती.

'भारत-चीन संबंध महत्त्वाचे'
नवी दिल्ली : भारत आणि चीन आपसांतील वादावर लवकरच तोडगा काढतील, अशी आशा व्यक्त करतानाच, प्रादेशिक स्थैर्यासाठी दोन्ही देशांमधील सौहार्दपूर्ण संबंध महत्त्वाचे आहेत, अशी प्रतिक्रिया रशियाने व्यक्त केली आहे. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आहेत. त्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव असून, त्यावर रशियाचे भारतातील उप-राजदूत रोमन बाबूश्किन यांनी पहिल्यांदा भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, 'आमच्या भारत आणि चीन या मित्रदेशांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध असणे खूपच महत्त्वाचे आहे. या गोष्टीमुळे स्थैर्य आणि शाश्वत विकासासारख्या मुद्द्यांवर प्रादेशिक चर्चा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आगामी शांघाय सहकार्य परिषद, ब्रिक्स आणि रशिया-भारत-चीन गटाच्या बैठकीमध्ये दोन्ही देशांमध्ये आणखी संवाद घडून येईल.'

Recent Posts