loader
Foto

करोनाविरुद्ध लढा: भारतासाठी अमेरिकेतून येणार १०० व्हेंटिलेटर

वॉशिंग्टन: करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी अमेरिकेकडून दिले जाणारे १०० व्हेंटिलेटर पुढील आठवड्यामध्ये भारताकडे दिले जातील, अशी माहिती 'व्हाइट हाउस'कडून देण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरध्वनीवरील संभाषणामध्ये ट्रम्प यांनी मोदींना याबाबत माहिती दिल्याचेही 'व्हाइट हाउस'च्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प आणि मोदी या दोन्ही नेत्यांदरम्यान 'जी-७'च्या एकूण स्वरूपाबाबतही चर्चा झाली; तसेच सुरक्षेच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले आहे.

करोनाविरुद्ध लढ्यामध्ये महत्त्वाचे ठरणारे १०० व्हेंटिलेटर पुढील आठवड्यात भारतात पोहोचतील. करोनाचा फटका बसलेल्या देशांमध्ये अमेरिका, ब्राझील, ब्रिटन, स्पेन आणि इटली या देशांनंतर भारताचा क्रमांक आहे. दोन लाखांपेक्षा जास्त जणांना भारतात करोनाची लागण झाली असून, साडेपाच हजारांच्यावर करोनाचे बळी गेले आहेत. करोनाचा फटका बसल्यानंतर त्यातून बचावासाठी व्हेंटिलेटर महत्त्वाचे ठरत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार करोनामुळे गंभीर असलेल्या पेशंटमधील दर पाच पेशंटपैकी एकाला व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. व्हेंटिलेटरमुळे पेशंटची श्वसनक्रिया सुरळित होते आणि त्याच्या शरीराला असलेला धोकाही टळतो. त्यामुळे असे व्हेंटिलेटर करोनाबाधित देशांसाठी महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतानेही व्हेंटिलेटची आवश्यकता वारंवार अधोरेखित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताला अमेरिकेने व्हेंटिलेटर देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार १०० व्हेंटिलेटर भारतात येणार आहेत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मंगळवारी रात्री फोनवरून चर्चा झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींनी या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 'जी-७' देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्याचे औपचारिक निमंत्रण दिले. डोनाल्ड ट्रम्प यांना 'जी-७' देशांच्या संघटनेचा विस्तार करायचा आहे. त्या दृष्टीने ट्रम्प यांनी उचलले हे पाऊल आहे. जगातील महत्वाच्या अर्थव्यवस्थांना 'जी-७'मध्ये प्रतिनिधित्वाची संधी देण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे.

२५ मिनिटे चर्चा - अमेरिकेत वर्णद्वेषावरून तणाव असतानाही ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये २५ मिनिटे चर्चा झाली. लडाखमध्ये भारत-चीनमध्ये सुरू असलेला सीमावाद, करोना व्हायरसमुळे निर्माण झालेले संकट आणि जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले.

'अमेरिकेच्या निर्णयांचे कौतुकच'
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलताना अमेरिकेत सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली व लवकरात लवकर या परिस्थितीतून मार्ग निघावा अशी इच्छा व्यक्त केली. 'जी-७' देशांच्या संघटनेचा विस्तार करण्याच्या ट्रम्प यांच्या भूमिकेचे मोदींनी कौतुक केले. 'यातून दूरदृष्टी दिसते करोनानंतरच्या जगाचे ते वास्तव आहे,' असे मत मोदींनी व्यक्त केले. 'परिषद यशस्वी करण्यासाठी अमेरिका आणि अन्य देशांसोबत मिळून काम करायला भारताला आनंदच होईल,' असेही पंतप्रधान म्हणाले.

Recent Posts