loader
Foto

अमेरिका: वर्णद्वेषविरोधी आंदोलनाला ट्रम्प यांच्या मुलीचा पाठिंबा

वॉशिंग्टन: कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइड या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत जोरदार आंदोलने सुरू आहेत. जॉर्जच्या मृत्यूचे पडसाद संपूर्ण अमेरिकेत उमटले असून तीव्र आंदोलन सुरू आहेत. अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आंदोलनाला ट्रम्प चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे वर्णद्वेषविरोधी आंदोलनाला ट्रम्प यांच्या मुलीने पाठिंबा दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी टिफनी ट्रम्पने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. टिफनीने सोशल मीडियावर काळी स्क्रीन पोस्ट करत आंदोलकांना पाठिंबा व्यक्त केला आहे. टिफनी यांनी इन्स्टाग्रामवर काळी स्क्रिन पोस्ट करत #BlackoutTuesday #justiceforgeorgefloyd या हॅशटॅगचा वापर केला आहे. एकट्याने प्रयत्न केल्यास कमी यश मिळेल. मात्र, सर्वांनी प्रयत्न केल्यास अधिक यश मिळेल, हा अमेरिकेतील लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या हेलन केलर यांचा विचारही पोस्टसोबत लिहीला आहे. टिफनी ट्रम्प या डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी पत्नी मार्ला मॅपल्स यांची कन्या आहे. मॅपल्स यांनीही आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला आहे.

वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी राज्यांच्या राज्यपालांना कठोर कारवाई घेण्याचे निर्देश दिले आहेत. न्यूयॉर्कमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. न्यूयॉर्कमधील आंदोलन आटोक्यात न आल्यास त्याचे परिणाम वाईट होतील असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. आंदोलकांविरोधात विविध कायद्यांतर्गत कारवाईची धमकी अमेरिकन सरकारने दिली आहे.

अमेरिकेत विविध ठिकाणी आंदोलने सुरुच आहेत. जॉर्ज फ्लॉइडची पत्नी रॉक्सी वॉशिंग्टन मिनिआपोलिसमध्ये आपली सहा वर्षांची मुलगी गियाना हिला घेऊन आंदोलनस्थळी आली होती. पत्रकारांसमोर बोलताना रॉक्सी वॉशिंग्टन म्हणाल्या, 'या लहानगीने आपले प्रेमळ वडील गमावले आहेत, हे साऱ्या जगाला कळू दे. आता तिला पदवीधर झालेली तो कधीच पाहू शकणार नाही. तो खूप चांगला होता, त्यामुळे मला त्याला न्याय मिळवून द्यायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या मनात खदखदणारा असंतोष मंगळवारी रात्रीच्या भव्य मोर्चांनंतर काहीसा शमला. देशातील सर्व प्रमुख शहरांत संचारबंदी झुगारून आंदोलक रस्त्यांवर उतरले. किरकोळ अपवाद वगळता गेले सात दिवस सुरू असलेला हिंसाचार मंगळवारी थांबला. देशभरात सुमारे ९००० आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

Recent Posts