loader
Foto

'या' अटी मान्य असतील WHOमध्ये पुन्हा सहभागी: अमेरिका

वॉशिंग्टन: करोना संसर्गाच्या मुद्यावर चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सातत्याने टीका केली आहे. करोनाच्या मुद्यावर अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्यत्व सोडले होते. आता पुन्हा अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्यत्व पु्न्हा स्वीकारण्याची सशर्त तयारी दाखवली आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी सांगितले की, अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेत पुन्हा सहभागी होण्यास तयार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भ्रष्टाचार आणि चीनच्या बाजूने भूमिका घेणे बंद केले तर अमेरिका पुन्हा सहभागी होईल असे त्यांनी सांगितले. शुक्रवारी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. निष्पक्ष भूमिका सोडून चीनची तळी उचलून धरणे, करोना संसर्गाची माहिती लपवणे आदी आरोप ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर लावले होते. जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा आवश्यक असून भ्रष्टाचार आणि चीनला झुकतं माप देणे बंद झाल्यास अमेरिका पुन्हा एकदा सदस्यत्व स्वीकारणार असल्याचे ओब्रायन यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी अमेरिकेतून मिळतो. अमेरिकेने निधी बंद केल्यामुळे आरोग्य संघटनेसमोर आर्थिक संकट उभे राहू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेला कोणता देश किती निधी देईल हे आधीपासूनच ठरलेले असते. संबंधित देशाची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या याआधारे निधीचा वाटा ठरवण्यात येतो. या निधीतून जागतिक आरोग्य संघटना आपले उपक्रम जगभरात राबवते. अमेरिका जवळपास २२ टक्के निधी देते.

Recent Posts