loader
Foto

मालदीव, यूएई भारतासाठी मैदानात; पाकिस्तानला तोंडघशी पाडलं

संयुक्त राष्ट्र म्हणजेच यूएनमध्ये भारताविरोधात इस्लामिक समन्वय संस्थेचा (ओआयसी) अनौपचारिक समूह तयार करावा हा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. मालदीव आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. इस्लामोफोबियावर यूएनमध्ये ओआयसीचा गट तयार करावा, असा पाकिस्तानचा प्रयत्न होता, जेणेकरुन मुस्लीम राष्ट्रांकडून यूएनमध्ये भारताविरोधात भूमिका मांडता येईल. पण ओआयसीच्या सदस्यांनीच पाकिस्तानच्या या प्रयत्नाला दाद दिली नाही. पाकिस्तानचं वृत्तपत्र डॉनने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मालदीवने यापूर्वीच ओआयसीच्या व्हर्च्युअल बैठकीत भारताच्या बाजूने जाहीरपणे भूमिका मांडली होती. इस्लामोफोबियासाठी भारताला लक्ष्य करणं हे फक्त वास्तविकदृष्ट्या चूकच नाही, तर दक्षिण आशियातील सामाजिक सलोख्यासाठी धोकादायकही आहे, असं मालदीवने या बैठकीत थेट सांगितलं होतं. आता संयुक्त अरब अमिरातीनेही पाकिस्तानच्या या प्रयत्नाकडे पाठ फिरवल्याची माहिती आहे. फक्त परराष्ट्र मंत्रीच असा गट तयार करू शकतात, असं यूएईकडून सांगण्यात आलं.

मालदीव कायम इस्लामोफोबिया, झेनोफोबिया आणि इतर कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या विरोधात आहे, ज्याचा अजेंडा हा राजकीय किंवा इतर प्रकारचा असेल. एखाद्या विशिष्ट देशाला लक्ष्य करणं हे मूळ मुद्दे मागे टाकण्यासारखं आहे, अशी परखड भूमिका मालदीवचे न्यूयॉर्कमधील स्थायी प्रतिनिधी थिलमिझा हुसैन यांनी दिली.

थिलमिझा हुसैन हे अमेरिकेतील मालदीवचे राजदूतही आहेत. पुढे ते म्हणाले, 'वेगळं पाडण्याचे सोशल मीडियावरील वक्तव्य हे काही जणांकडून चुकीच्या माहितीवर आधारित असतात आणि ते १३५ कोटी भारतीयांच्या भावना व्यक्त करत नाहीत.'

ओआयसीमध्ये यूएई आणि मालदीवची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. कारण, या समुहाकडून स्वतःला मुस्लीम समुदायाचा आवाज सांगितलं जातं. पण या समुहातील देशांनीच पाकिस्तानचा डाव हाणून पाडला. या समुहाने जम्मू काश्मीरमधील कलम ३७० काढण्यावरुनही भारताला लक्ष्य केलं होतं. तर दुसरीकडे याच गटातील अनेक महत्त्वाच्या देशांनी भारताविरोधात बोलणं टाळलं होतं.

Recent Posts