loader
Foto

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पुन्हा आक्षेप

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ट्विटर यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या एका ट्विटला ट्विटरने आक्षेप घेतला असून त्यांचे ट्विट हे हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे असल्याचा इशारा झळकावला आहे. मिनीपॉलिसंमध्ये कृष्णवर्णिय व्यक्तीच्या हत्येनंतर त्या ठिकाणी हिंसाचार उफाळून आला आहे. त्यावर ट्रम्प यांनी ट्विटवर प्रतिक्रिया दिली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले की, शहरात हिंसाचार होत असताना मी शांतपणे पाहू शकत नाही. वाढता हिंसाचार हा प्रबळ नेतृत्वाचा अभाव दर्शवत आहे अथवा डाव्या विचारांचे महापौर जेकब फ्रे यांचे अपयश असू शकते. लवकरात लवकर शहरात शांतता आणण्यासाठी नॅशनल गार्डला पाठवत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. तर, त्याच्या पुढील ट्विटमध्ये ट्रम्प यांनी हिंसाचार, लुटपाट सुरू झाल्यास गोळ्या घालण्यात येणार असल्याचे म्हटले. ट्विटरने या दुसऱ्या ट्विटला आक्षेप घेतला असून हे ट्विट हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे असल्याचे म्हटले आहे. सदरील ट्विट हे ट्विटरच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणारे असल्याचेही ट्विटरने म्हटले.

दरम्यान, ट्विटरसोबत झालेल्या वादावादीनंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. या आदेशामुळे सरकारी यंत्रणांना फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक अधिकार मिळणार आहेत. या कार्यकारी आदेशाविरोधातही ट्विटरने नाराजी व्यक्त केली असून इंटरनेट स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

Recent Posts