loader
Foto

निर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा

हाँगकाँग: चीन सरकारने मंजूर केलेल्या हाँगकाँग सुरक्षा विधेयकाच्या मुद्यावर चीन व अमेरिकेमध्ये शाब्दिक हल्ले-प्रतिहल्ले जोरात सुरू आहेत. हाँगकाँगचा विशेष आर्थिक दर्जा काढण्याची धमकी अमेरिकेने दिल्यानंतर अमेरिकेने अंतर्गत वादात पडू नये असे, हाँगकाँग सरकारने म्हटले आहे. यामध्ये अमेरिकेचेही मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हाँगकाँगमध्ये नवीन सुरक्षा कायदा लागू करण्यास स्थानिक लोकशाहीवादी कार्यकर्त्यांचा विरोध आहे. या कायद्याविरोधात अनेक तीव्र आंदोलनेही झाली आहेत. चीनच्या संसदेने या विधेयकाला मंजुरी दिल्यास हाँगकाँगला देण्यात आलेला विशेष आर्थिक दर्जा रद्द करण्याची धमकी अमेरिकेने दिली होती. त्याशिवाय इतरही निर्बंध लादणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अमेरिकेने हा दर्जा काढल्यास अमेरिकेलाही मोठे नुकसान होणार असल्याचा इशारा हाँगकाँगमधील सरकारने दिला आहे. हे निर्बंध दुधारी तलवारीसारखे असल्याचेही म्हटले आहे.

अमेरिकेने हाँगकाँगवर निर्बंध लादल्यास अमेरिकेवरही त्याचा प्रभाव पडणार आहे. एका वृत्तानुसार, वर्ष २००९ ते २०१८ पर्यंत अमेरिकेने हाँगकाँगसोबत २९७ अब्जाचा व्यापार केला आहे. हाँगकाँग हा अमेरिकेचा मोठा व्यावसायिक भागीदार राहिला आहे. सध्या हाँगकाँगमध्ये जवळपास १३०० अमेरिकी फर्म कार्यरत आहेत.

दरम्यान, हाँगकाँग सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सप्टेंबरपासून होणार असल्याचे चीन सरकारने म्हटले आहे. या कायद्यामुळे चिनी गुप्तचर संस्थांना हाँगकाँगमध्ये जाळे पसरवण्यास अधिक सुलभ होणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, या कायद्यामुळे लोकशाही अधिकारांची पायमल्ली होणार असून 'एक देश, दोन व्यवस्था' या सूत्राला धक्का लागणार असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
 

Recent Posts