loader
Foto

तरुणांनो, टिळकांचं साहित्य वाचलं तरी अनेक प्रश्न सुटतील : अमित शहा

लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकमान्यांना आदरांजली अर्पण केली. 'भारत लोकमान्य टिळक यांना त्यांच्या १०० व्या पुण्यतिथी निमित्तानं नमन करत आहे. त्यांच्या बुद्धीमत्ता, साहस, भावना आणि स्वराज्याचे विचार नेहमीच प्रेरणा देत राहतील' असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, हा नारा लोकमान्यांनी दिला होता. १९ व्या शतकात त्यांनी सगळ्याचा त्याग करून संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचलं. हे अनेक लोक करू शकत नाहीत. इतिहासात टिळकांचं नाव सुवर्णाक्षरांत लिहिलं जाईल' असं अमित शहा यांनी म्हटलंय. 'लोकमान्य टिळक : स्वराज ते आत्मनिर्भर भारत' या वेबिनारमध्ये बोलत होते.

'लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व देशवासियांच्यावतीने मी त्यांना नमन करतो. तरुणांना भारत आणि इतिहास जाणून घ्यायचा असेल तर त्यांनी टिळकांचं साहित्य वाचायला हवं. देशातील तरुणांनी लोकमान्य टिळकांचे आत्मचरित्र वाचले तरी त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या सुटतील. आज १०० वर्ष उलटल्यानंतरही लोकमान्यांचे विचार तितकेच कालसुसंगत आहेत. यावरुन लोकमान्य टिळक किती द्रष्टे नेते होते, याची कल्पना येते' असंही अमित शहा यांनी म्हटलंय.

अमित शहांच्या हस्ते परिचर्चेचे उद्घाटन
लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित भारतीय सांस्कृतिक परिषदेच्या वतीनं आज (शनिवारी) एका आंतरराष्ट्रीय परिचर्चेचं वेबिनारच्या स्वरूपात आयोजन केलंय. या परिचर्चेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आलं. 'लोकमान्य टिळक : स्वराज ते आत्मनिर्भर भारत' हा या परिचर्चेचा विषय असून त्यात देशविदेशातल्या तज्ज्ञ मंडळींचा सहभाग आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एस. गुरुमूर्ती या परिचर्चेचा समारोप करणार आहेत. भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे अध्यक्षस्थानी आहेत. शनिवारी, सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडे पाचपर्यंत ही चर्चा सुरू आहे.

या परिचर्चेत लोकमान्यांनी स्थापन केलेल्या पुण्याच्या डेक्कन एजुकेशन सोसायटीसह भारतीय समाजशास्त्र संशोधन परिषद (आयसीएसएसआर), इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस् इत्यादी संघटनांचाही सहभाग आहे. मुख्य कार्यक्रम पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधील अँफी थिएटरमधून व अन्य ठिकाणांहून वक्ते आपापले विचार मांडत आहेत. ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे, लंडनमधील लेखक गॉर्डन जॉन्सन व संकेत कुलकर्णी, बिल्डर्स ऑफ मॉडर्न इंडिया या मालिके अंतर्गत एन. जी. जोग यांनी लिहिलेल्या टिळक चरित्राचे ब्रह्मदेशाच्या भाषेत भाषांतर केलेले लेखक मूआंग मूआंग, कुरुक्षेत्र विद्यापीठातील प्राध्यापक राघवेंद्र तंवर, मुंबईचे विकास परांजपे, अहमदाबादचे इतिहास संशोधक प्राध्यापक रिझवान काद्री, छत्तीसगढमधील पत्रकार, लेखक डॉक्टर सुशील त्रिवेदी तसेच अर्थशास्त्रज्ञ डॉ. व्ही. के. मल्होत्रा हेदेखील या परिचर्चेत सहभागी झालेत.

Recent Posts