loader
Foto

आता लॉकडाउन नाहीच!

नागपूर: करोनाबाधितांची वाढती संख्या आणि सणांचे दिवस बघता नागपूर शहरात पुन्हा लॉकडाउन लागू शकतो या चर्चेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि महापौर संदीप जोशी यांनी, शहरात आता लॉकडाउन लागणार नाही, असे जाहीरपणे सांगितले. प्रशासनाने लॉकडाउनचा धाक दाखविणे बंद करावे. यादृष्टीने हालचाली जरी दिसल्या तरी सर्व लोकप्रतिनिधी आंदोलनाची भूमिका घेऊ, असा इशारा महापौरांनी दिला.

महापौर जोशी यांनी शुक्रवारी दुपारी शहरातील लोकप्रतिनिधींची तर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकांनंतर महापौर आणि पालकमंत्र्यांनी लॉकडाउनबाबतची भूमिका स्पष्ट केली. मागील आठवड्यात शनिवार आणि रविवार असे दोन उपराजधानीमध्ये जनता कर्फ्यू होता. आजची बकरी ईद आणि सोमवारच्या राखी पौर्णिमेमुळे शहरात लॉकडाउन लागू शकतो, अशी जोरदार चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाउनबाबत स्पष्टीकरण देण्यात आले.

करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी स्मार्ट अॅक्शन प्लान तयार करा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची अॅण्टीजेन टेस्ट केली पाहिजे. आगामी काळात चतुर्थ श्रेणी कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता भासू शकते. ती भरून काढण्यासाठी खासगी संस्थेची मदत घ्यावी, असेही निर्देश डॉ. राऊत यांनी दिले.

शहरातील बारा मीटर रुंद रस्त्यांवरील दोन्ही बाजूंची दुकाने रोज सुरू करावीत. इतवारी, मस्कासाथ व इतर दाटीवाटीच्या वस्त्यांतील सहा मीटर रुंदीच्या रस्त्यांवरील दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू करावीत, अशी सूचना जोशी यांनी केली. न्यायालयाचे आदेश असतानाही शहरात अतिक्रमण कारवाई सुरू असल्याबद्दल या बैठकीत नाराजी व्यक्त आली. सोशल मीडियावरून दिली जाणारी लॉकडाउनची धमकी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नाव न घेता दिला. महापालिकेतील लोकप्रतिनिधींची पुढील बैठक ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास करोना नियंत्रणात येऊ शकतो. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात करोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे अधिक खबरदारी गरजेची आहे.

-नितीन राऊत, पालकमंत्री
लॉकडाउनची आता गरज नाही. नागपूरकरांनी हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रत्येकाने शिस्तीचे पालन केले पाहिजे.

संदीप जोशी, महापौर

Recent Posts