loader
Foto

धक्कादायक शपथपत्र; 'त्या' करोना योद्ध्यांच्या तपासणीची गरज नाही!

नागपूर:नागपूर शहरातील मोमीनपुरा व सतरंजीपुरा येथील करोना योद्ध्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला असला तरी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करोना योद्ध्यांची तपासणी करायची गरज वाटत नाही, असे धक्कादायक शपथपत्र हायकोर्टात सादर केले आहे. दरम्यान हायकोर्टाने शपथपत्राकडे दुर्लक्ष करीत करोना योद्धांची तपासणी करण्याचा आदेश कायम ठेवला.

सिटिजन फॉर इक्वलिटी यांनी करोना योद्ध्यांची तपासणी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका हायकोर्टात सादर केली आहे. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने करोना योद्ध्यांच्या तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी १०४८ करोना योद्ध्यांची तपासणी करण्यात येईल असे सांगितले. परंतु महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त त्यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरोधी भूमिका हायकोर्टात घेतली.

महापालिकेच्या शपथपत्रानुसार, सतरंजीपुरा व मोमिनपुरा येथे काम करणारे पोलीस, डॉक्टर्स, परिचारिका यांना पीपीई किट देण्यात आली आहे. तसेच पोलिसांना हॅन्डग्लोव्हज, सॅनिटायझर इत्यादी साधने देण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांची करोना तपासणी करण्याची गरज वाटत नाही, असे स्पष्टपणे शपथपत्रात नमूद केले आहे. त्यासोबतच सुरक्षा साधने आणि पीपीई किट न वापरता कोणी काम करत असल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असे शपथपत्रात म्हटले आहे. दरम्यान महापालिकेने घेतलेल्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून महापालिकेच्या शपथपत्राची गंभीर दखल न्यायालयाने घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्ते करणार आहेत.

Recent Posts