loader
Foto

'फडणवीसजी, राज्यासाठी आपण काय करतोय यावर आत्मपरीक्षण करा'

मुंबई: पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्राच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'फडणवीसजी, पवार साहेबांच्या पत्राची चिंता करण्याऐवजी राज्यासाठी आपण काय करतो यावर आत्मपरीक्षण करा,' असा टोला रोहित पवार यांनी हाणला आहे. 

'करोना'च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळं विविध क्षेत्रांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शरद पवार हे पत्राच्या माध्यमातून अधूनमधून हे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देत आहेत. अलीकडंच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी पंतप्रधानांकडं केली आहे. त्यावरून फडणवीस यांनी पवारांना एक सल्ला दिला आहे. राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून पवारांनी मदतीची मागणी करावी, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. 'पवार साहेबांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळं साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण करा. ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

दुसऱ्या एका ट्विटमधून रोहित पवार यांनी फडणवीसांच्या सततच्या 'राजभवन'भेटींवरही भाष्य केलं आहे. कालच फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारची तक्रार केली होती. त्यावर रोहित पवार म्हणतात, 'आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यावर महाविकास आघाडीचं सरकार व मुख्यमंत्री साहेब काम करतच आहेत. पण राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल.'

Recent Posts