loader
Foto

कोविड योद्ध्यांसाठी अमित ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र...

मुंबई: करोनाविरुद्धच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढणाऱ्या डॉक्टर व नर्सेसच्या मानधनात कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेनं जोरदार आक्षेप घेतला आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. 'डॉक्टरांची योग्य काळजी घेतली जाणार नसेल तर ते योद्धे आहेत या विधानाला काही अर्थ राहणार नाही, असं अमित यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग व आरोग्य सेवा आयुक्तलयानं २० एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार, बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मासिक मानधन ५५ हजार व ६० हजार असं निश्चित केलं आहे. त्यापूर्वी हे मानधन वेतन व भत्ते मिळून ७८ हजार इतके होते. मात्र, नव्या आदेशान्वये बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचं मानधन कंत्राटी सेवेच्या निकषावर निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळं त्यांच्या मानधनात २० हजार रुपयांची कपात झाली आहे. बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर व परिचारिकांच्या मानधनातील ही कपात अन्यायकारक असल्याचं अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
सध्याच्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात डॉक्टर व परिचारिका अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत. हरियाणासारख्या राज्यात करोनाच्या काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मानधन दुप्पट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून तितक्या उदारपणाची अपेक्षा नसली तरी डॉक्टरांच्या वेतनात किंचितही कपात होणार नाही याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे, अशी अपेक्षा अमित यांनी व्यक्त केली आहे.

सध्याच्या परिस्थितीत आरोग्य सेवकांच्या सेवेचं मोलच होऊ शकत नाही. त्यांच्या परिश्रमाचं मोल त्यांना अधिक भत्ता देऊन करायला हवं. मानधन कमी करून नाही. अन्यथा करोनाविरुद्ध लढणारे डॉक्टर व परिचारिका हे योद्धे आहेत, या विधानाला कोणताही अर्थ राहणार नाही, याची आठवण अमित यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे. अमित ठाकरे यांचं हे पत्र मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करण्यात आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत राज्य सरकारला करोनानंतरची वैद्यकीय परिस्थिती व लॉकडाऊन संदर्भात अनेक सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही ते आवर्जून उपस्थित होते. मात्र, करोना काळातील सरकारच्या निर्णयाबद्दल अमित ठाकरे यांनी प्रथमच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

Recent Posts