loader
Foto

रत्नाकर मतकरींबाबत व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा 'तो' मेसेज खोटा...

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या निधनाच्या कारणांची चर्चा करणारा, सध्या व्हायरल होत असलेला व्हॉट्सअॅप मेसेज पूर्णपणे खोटा व निराधार असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे. मतकरी यांचे चिरंजीव गणेश मतकरी यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून या संदर्भात सविस्तर खुलासा केला आहे.
रत्नाकर मतकरी यांचं नुकतंच निधन झालं. मतकरी यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाबरोबरच महाराष्ट्रालाही धक्का बसला. त्यांंना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. अत्यंत शिस्तप्रिय व आरोग्याची सर्व प्रकारची काळजी घेणाऱ्या मतकरी यांना करोनाची लागण कशी झाली हे कोडं सर्वांनाच पडलं आहे. अशातच रेवती भागवत यांनी व्हॉट्सअॅपवर मतकरी यांच्याबद्दल टाकलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. मतकरी यांना करोनाची लागण कशामुळं झाली असावी, याबद्दल त्यांनी काही तर्कटं मांडली आहेत. मतकरी कुटुंबाशी आपलं बोलणं झाल्याचा दावाही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे.

गणेश मतकरी यांनी भागवत यांची ही सर्व तर्कटं फेटाळली आहेत. या पोस्टमुळं आम्हाला धक्का बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'करोनाच्या काळात बाबा आणि आई कधीही घराबाहेर गेले नाहीत. त्यांना औषधं वा इतर गोष्टी दर १५ दिवसांनी आम्हीच द्यायचो. लॉकडाऊनच्या काळात घरी कामालाही कोणी नव्हतं. बाबांना धोक्याची पूर्ण कल्पना होती. ते सर्व प्रकारची काळजी घेत होते. त्यामुळं त्यांना निष्काळजीपणामुळे संसर्ग झाला असण्याची शक्यता नाही. ही अनावश्यक चर्चा आता थांबेल अशी अपेक्षा आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.

'आमच्या कुटुंबीयांपैकी कोणाशीही भागवत यांचं बोलणं झालेलं नाही. त्यांनी पोस्टमध्ये जे काही लिहिलं आहे त्यात तथ्य नाही. त्यामुळं या पोस्टकडे दुर्लक्ष करा आणि ती फॉरवर्ड करू नका, अशी विनंती गणेश मतकरींनी केली आहे.

Recent Posts