loader
Foto

ट्रम्प यांचे 'मिशन पीस डील'; 'या' अरब देशासोबत इस्रायलचा मैत्री करार!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'मिशन पीस डील' सुरू असल्याचे चित्र आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर आता आणखी एक यशस्वी मध्यस्थी ट्रम्प यांनी केली आहे. इस्रायल आणि बहरीन यांच्यात शांतता करार झाला असून दोन्ही देशांमध्ये राजनयिक संबंध सामान्य होणार आहेत.

एक महिन्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये यशस्वी मध्यस्थी करत जवळपास ७२ वर्षांनंतर दोन्ही देशांमध्ये मैत्री संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आता बहरीन आणि इस्रायलमध्ये मैत्री करार झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीनंतर इस्रायलनंतर आता बहरीन या आणखी एका अरब देशाने इस्रायलसोबत मैत्री करार केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि बहरीनचे किंग हमद बिन इसा अल खलीफा यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी या मैत्री कराराची माहिती जाहीर केली.

इस्रायल आणि बहरीनमध्ये आता राजनयिक संबंध निर्माण होणार आहे. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरू होणार आहे. त्याशिवाय, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण, सुरक्षा आणि कृषी आदी क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे. हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. आतापर्यंत इस्रायलसोबत मैत्री करण्यास अनेक देश टाळाटाळ करत होते. आता या परिस्थितीत बदल होत असून मैत्री संबंध निर्माण होत आहेत. पश्चिम आशिया अधिक स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Recent Posts