loader
Foto

पंतप्रधान मोदींच्या ट्विटमुळे शिंजो आबे भावूक; व्यक्त केली 'ही' भावना

प्रकृती अस्वास्थामुळे पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा करणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे. आबे यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले होते. पंतप्रधान मोदी यांचे हे शब्द काळजाला भिडले असल्याचेआबे यांनी म्हटले.

शिंजो आबे यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांचे ट्विट काळजाला भिडले आहे. भविष्यातही भारत आणि जपान यांच्यातील मैत्री कायम राहिल व आणखी वृद्धिगंत होणार असल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या सदिच्छांसाठी आभार मानले आहेत. भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी वृद्धिगंत होतील असा विश्वासही व्यक्त केला.

शिंजो आबे हे आतड्यासंबंधीच्या आजाराने ग्रस्त आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या या आजाराने पुन्हा उचल खाल्ली. उपचाराअभावी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळता येणार नसल्यामुळे त्यांनी जनतेची माफी मागत राजीनाम्याची घोषणा केली. आबे यांच्यानंतर पंतप्रधानपदी कोण असणार, याची लवकरच घोषणा होणार आहे. तोपर्यंत आबे पंतप्रधानपदावर असणार आहेत. शिंजो आबे हे मागील आठवड्यात दोन वेळेस रुग्णालयात दाखल झाले होते. सातत्याने रुग्णालयात उपचारासाठी जात असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी जवळपास सात तास आबे रुग्णालयात दाखल होते. आबे यांच्या पंतप्रधानपदाचा कार्यकाळ सप्टेंबर २०२१ पर्यंत आहे. जपानच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले ते पहिलेच पंतप्रधान आहेत.

पंतप्रधान मोदी यांचे ट्विट
शिंजो आबे यांनी पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आबे यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढणारे ट्विट केले होते. पंतप्रधान मोदी यांनी आबे यांच्या प्रकृती स्वास्थासाठी शुभेच्छा दिल्या. आबे यांच्या प्रकृती अस्वास्थाची बातमी ऐकून मनाला वेदना झाल्याचे मोदींनी म्हटले होते. आबे यांचे कुशल नेतृत्व आणि प्रतिबद्धता यांच्यामुळे भारत-जपान यांच्यातील संबंध आणखी मजबूत झाले असल्याचेही पंतप्रधान मोदींनी म्हटले.

Recent Posts