loader
Foto

चीनचं चाललंय काय? अरुणाचल सीमेवरील गावे रिकामी करण्यास सुरुवात

मागील काही महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यान सीमा प्रश्नी वाद सुरू आहे. दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याचा प्रयत्न सुरू असताना चीन सीमा भागात जोरदार हालचाली करत आहे. चीनने अरुणाचल आणि भूटान सीमेवरील तिबेटी नागरिकांना हटवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनला नेमके काय साध्य करायचे आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.

चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार हा खुलासा करण्यात आला आहे. चीन भारत आणि भूतान सीमेजवळ असणाऱ्या ९६ गावांतील लोकांना सीमेपासून दूर असणाऱ्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करत आहे. या ग्रामस्थांना नवीन घरे देण्यात आली असून यामध्ये वीज, पाणी आणि इंटरनेटसारख्या सुविधा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, सीमेलगतच्या भागात चीनकडून जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र तैनात करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

भारत आणि भूतान सीमेजवळील तिबेटी लोकांना हटवण्याचे काम २०१८ पासूनच सुरू करण्यात आले होते. त्यावेळी ले गावातील २४ घरातील ७२ लोकांचे नवीन घरात स्थलांतर करण्यात आले होते. ही नवीन घरे जुन्या मूळ घरांपासून दूरवरच्या अंतरावर आहे. मात्र, या स्थलांतरामुळे तिबेटी नागरिकांचे उत्पन्न वाढले असल्याचा दावा चीनने केला आहे.

चीन ३० सप्टेंबरपर्यंत सर्वच ९६ गावांतील लोकांसाठीचे पुनर्वसनाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या ग्रामस्थांना या नव्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. चीन अरुणाचल प्रदेशचा तवांग हा आपला भाग असल्याचा दावा करतो. तवांग हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे चीन सांगतो. तवांग हा बौद्ध धर्मातील पवित्र स्थळापैकी एक आहे. १९६२ च्या युद्धात चिनी सैन्य तवांगपर्यंत पोहचले होते.
 

Recent Posts