loader
Foto

फ्रान्स ग्रीसला देणार १८ राफेल; त्यातील आठ विमाने मोफत!

भूमध्य सागरामध्ये ग्रीस आणि तुर्कीमध्ये मागील काही दिवसांपासून तणाव वाढू लागला आहे. तुर्कीच्या आक्रमक भूमिकेविरोधात फ्रान्सने ग्रीसला लष्करी मदत देण्याची घोषणा केली होती. आता तुर्कीच्या अद्यावत एफ-१६ फायटर जेटचा सामना करण्यासाठी फ्रान्स ग्रीसला १८ राफेल लढाऊ विमाने देणार आहे. त्यातील १० विमाने ही राफेलची एफ३-आर वॅरिएंटची असणार आहे. तर, उर्वरीत आठ विमाने सेकंड हँड जेट्स असणार आहेत. त्यासाठी मात्र, ग्रीसला कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही.

तुर्कीचे राष्ट्रपतींनी ग्रीसला धमकी दिल्यानंतर फ्रान्सने ग्रीसच्या संरक्षणासाठी भूमध्य सागरात आपले नौदल तैनात केले. त्यानंतर तुर्की आणि फ्रान्समध्ये तणाव वाढू लागला. तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फ्रान्सवर टीका केली होती. फ्रान्सकडून युद्ध छेडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका त्यांनी केली. तर, आपल्या मित्र देशाच्या संरक्षणासाठी फ्रान्स कोणतेही पाऊल उचलण्यास मागे हटणार नसल्याचे फ्रान्सने म्हटले होते.

ग्रीसला घाबरवण्यासाठी तुर्कीने काही आठवड्यांपूर्वी कस्तेलोरिजो बेटाजवळ नौदलाचे काही जहाज पाठवले. त्याच्या प्रत्युत्तरात ग्रीसनेदेखील आपले नौदल कस्तेलोरिजो बेटाजवळ तैनात केले आहेत. दोन्ही देशांचे नौदल या भागात उभे ठाकले असून नौसैनिकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

तुर्की-ग्रीसमध्ये वाद काय?
मागील काही दिवसांपासून तुर्कीचे ओरूक रीस तेल शोधक जहाज हे ग्रीसच्या अखत्यारीत असणाऱ्या कस्तेलोरिजो या बेटाजवळ तेल विहीर, नैसर्गिक वायू साठ्याबाबत संशोधन करत आहे. ग्रीसने यावर आक्षेप घेतला आहे. तुर्कीचे जहाज ग्रीसच्या हद्दीत आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर, तुर्कीने ग्रीसचा हा दावा फेटाळून लावत तो समुद्री भाग आमचाच असल्याचे म्हटले आहे.

तुर्की आणि ग्रीस यांच्यात भूमध्य सागराच्या ताब्यावरून जुना वाद आहे. पूर्व भूमध्य सागराच्या हायड्रोकार्बन साठ्याच्या शोधानंतर ग्रीस आणि तुर्कीच्या ऊर्जा संपत्तीच्या ताब्यावरून वाद सुरू आहे. तुर्की या भागात अवैधपणे उत्खन्न करत असल्याचा दावा ग्रीस आणि युरोपीयन संघाने केला आहे. तर, हा भाग आमच्या विशेष आर्थिक क्षेत्रात येत असल्याचा दावा केला आहे.

Recent Posts