loader
Foto

'निवडणुकीत माझा पराभव झाल्यास अमेरिकेवर चीनचा ताबा'

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून अधिकृत उमेदवारी स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर जोरदार हल्ला बोल केला आहे. निवडणुकीत माझा पराभव होऊन बायडन विजयी झाल्यास चीन देशवर ताबा मिळवणार असल्याचा आरोप केला.

ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर जोरदार टीका केली. बायडन यांचा निवडणूक अजेंडा हा मेड इन चायना असून माझा अजेंडा मेड इन अमेरिका आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, या निवडणुकीत पुन्हा विजयी झाल्यास आगामी चार वर्षात अमेरिकेला मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये सुपरपॉवर बनवू. देशामध्ये रोजगाराच्या संधी विकसित करण्यासोबतच आरोग्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेचे चीनवरील अवलंबित्व कमी करणार असून आत्मनिर्भर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, वॉशिंग्टनमध्ये चीनविरोधात न बोलण्याचा सल्ला मला काही जणांनी दिला होता. चीनने आपल्या देशातील रोजगार चोरला तरी हरकत नाही असे काहींनी म्हटले होते. मात्र, अमेरिकन जनतेला वचन दिले होते. अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंतचे चीनविरोधात सर्वात मोठे पाऊल उचलले असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेसह सगळे जग हैराण झाले आहे. चीनने करोनाचा संसर्ग संपूर्ण जगभरात फैलावला असल्याचाही दावा त्यांनी केला.

करोनाला अटकाव करणाऱ्या लशींबाबतही त्यांनी माहिती दिली. तीन लशी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. यावर्षात करोनावर प्रभावी लस आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिका चंद्रावर पहिली महिला अंतराळवीर उतरवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. अमेरिका आपली मंगळ ग्रहावरील मोहीम फत्ते करणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, भारतीय अमेरिकी वंशाच्या निक्की हेली यांच्यासह रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन; तसेच उपाध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर टीका केली. बायडन, हॅरिस यांचा निवडणुकीत विजय झाल्यास अर्थव्यवस्थेसाठी विध्वंसक ठरेल; तसेच ते अमेरिकेला समाजवादी देश करतील, अशी टीका रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी केली.

रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात (आरएनसी) सोमवारी या नेत्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार बायडन; तसेच उपाध्यक्षपदाच्या उमेदवार हॅरिस यांच्यावर टीकेची झोड उठवली. तीन नोव्हेंबरच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला, तर अमेरिकेचे भवितव्य धोक्यात येईल, असेही रिपब्लिकन नेत्यांनी म्हटले आहे.

Recent Posts