loader
Foto

सीरियात अमेरिका आणि रशियाच्या सैन्यांमध्ये राडा; चार जखमी

जगातील दोन शक्तीशाली देश असलेले रशिया आणि अमेरिकेच्या सैन्यांमध्ये सीरियात तीव्र संघर्ष झाल्याचे समोर आले आहे. या संघर्षात काही सैन्य जखमी झाले आहेत. यु्द्धाच्या झळा सहन करत असलेल्या सीरियात अमेरिका-रशियाच्या सैन्यांमध्ये हा संघर्ष झाला.

रशियन सैन्याच्या एका गटाकडून आर्मर्ड व्हेइकलने अमेरिकन सैन्याला धडक दिली. त्यानंतर या सैन्यांमध्ये हाणामारी झाली असल्याचे वृत्त आहे. यामध्ये चारजण जखमी झाले आहेत. अमेरिकन सैन्यासोबत हाणामारी सुरू असताना रशियाने आपल्या हेलिकॉप्टरचाही वापर केला असल्याचे एका व्हिडिओत समोर आले आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांनी सांगितले की, उत्तर पूर्व सीरियात अमेरिकन आणि रशियन सैन्य समोरासमोर आले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाले. त्यातच रशियन आर्मर्ड व्हेइकलने अमेरिकेच्या आर्मर्ड व्हेइकलला धडक दिली. यामध्ये काही सैनिक जखमी झाले. तणाव कमी होण्यासाठी त्या भागातून अमेरिकन सैन्याने माघार घेतली असल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले.

अमेरिका आणि रशियातील संघर्ष रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांचे रशियाने उल्लंघन केले असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. आम्हाला तणाव वाढवण्याची इच्छा नाही. मात्र, कोणत्याही आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज असल्याचेही अमेरिकेने म्हटले.

अमेरिका-रशियाच्या सैन्यामध्ये जोरदार राडा झाला असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेच्या आर्मर्ड व्हेइकलने रशियाच्या आर्मर्ड व्हेइकलसह असणाऱ्या गस्ती पथकाला अडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अमेरिकन सैन्याला दाद न देता रशियन सैन्याने पुढे जात होते. त्या दरम्यान एका अमेरिकन आर्मर्ड व्हेइकलला रशियन आर्मर्ड व्हेइकलने धडक दिली. अमेरिकन सैनिकांना पळवून लावण्यासाठी रशियाचे हेलिकॉप्टरही तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले.

Recent Posts