loader
Foto

हुकूमशहा किम जोंगचा मोठा निर्णय; बहिणीला दिले 'हे' अधिकार

उत्तर कोरियाचे राष्ट्रपती व हुकूमशहा किम जोंग उन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. किम जोंग उनने त्यांची बहीण किम यो जोंगच्या अधिकारात वाढ केली आहे. यामुळे आता किम यो जोंग या उत्तर कोरियाच्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वोच्च नेत्या असणार आहेत. दक्षिण कोरियाच्या गुप्तचर संस्थानी दिलेल्या माहितीनुसार आता किम यो जोंग अमेरिका आणि दक्षिण कोरियाबाबतचे निर्णय घेणार आहे. तर, दुसरीकडे किम यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

उत्तर कोरियातील सूत्रांनी मात्र, किम जोंग उन यांच्यावरील जबाबदारीचा भार हलका करण्याच्यादृष्टीने काही निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. किम जोंग उन आताही उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते असणार आहेत. किम यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना हा निर्णय समोर आल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत.

दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्थेच्या एका कमिटीचे सदस्य ताई क्यूंग यांनी सांगितले की, गुरुवारी सत्तेचे हस्तातंरण करण्यात आले. किम जोंग उन यांच्याकडे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार असले तरी त्यांनी आता बहिणीलाही अधिक अधिकार दिले आहेत. किम जोंग यांनी बहिणीला अधिक अधिकार देऊन आता अप्रत्यक्षपणे बहिणीलाच उत्तराधिकारी नेमले असल्याची चर्चा सुरू आहे.

किम जोंग उन यांना तीन मुले आहेत. काही मोजक्या कार्यक्रमांत त्यांनी पत्नीसह उपस्थिती लावली आहे. मात्र, मुलांबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत असून त्यांना एकदाही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित केले नाही. काही महिन्यांपूर्वी किम यांची प्रकृती ढासळली असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर किम हे २१ दिवस सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते.

दरम्यान, किम जोंगने उत्तर कोरियाच्या अर्थव्यस्वथेबाबत मोठा इशारा दिला आहे. उत्तर कोरियावर विविध संकटे ओढावली आहेत. अनपेक्षितपणे अनेक आव्हाने, संकटांना सामोरे जाण्याची तयारी सर्वांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. करोना संकटामुळे आणि असलेल्या निर्बंध लागू असताना उत्तर कोरियाला मोठ्या खाद्यान्न संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता आधीच हलाखीची असणारी अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडणार असल्याचे म्हटले जात आहे.

Recent Posts