loader
Foto

पाहा: ७१ वर्षीय राष्ट्रपतींनी समुद्रात बुडणाऱ्या दोघींना वाचवले

समुद्रात बुडत असणाऱ्या दोन महिलांचे प्राण पोर्तुगालच्या ७१ वर्षीय राष्ट्रपतींनी वाचवले. अलगर्व बीचवर ही घटना घडली. राष्ट्रपतींनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सध्या कौतुक होत असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मुलींची छोटी नौका अचानकपणे उलटली. त्यानंतर प्राण वाचवण्यासाठी त्या धडपड करत होत्या.

पोतुर्गालचे राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सूसा (Marcelo Rebelo De Sousa) हे सध्या सुट्टीवर आहेत. देशाच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी त्यांनी पर्यटन सुरू केले आहे. राष्ट्रपती मार्सेलो रेबेलो डी सूसा (Marcelo Rebelo De Sousa)यांनी सांगितले की, या महिला समुद्रात अडकल्या होत्या. समुद्राच्या उंच लाटा उसळत होत्या. त्यातच त्यांची नौका उलटली. प्राण वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. या धडपडीत त्यांच्या पोटात मोठ्या प्रमाणावर समुद्राचे पाणी गेले. समुद्राचे पाणी पोटात गेल्यामुळे आणि उसळलेल्या लाटांमुळे या महिलांना पोहण्यास अडचण येत होती.

या महिलांनी बचावासाठी हाका मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी किनाऱ्याजवळ असलेल्या राष्ट्रपतींनी तात्काळ समुद्रात उडी मारली आणि या महिलांजवळ पोहचले. त्याच वेळी जेट स्कीने आणखी एक व्यक्ती त्यांच्याजवळ पोहचला. त्यांनंतर या सर्वांनी या महिलांना समुद्रात बाहेर काढले.

राष्ट्रपतींनी घटनास्थळी जेट स्कीने तात्काळ पोहचणाऱ्या व्यक्तीचे कौतुक करत देशप्रेमी असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय भविष्यात नौका घेऊन समुद्रात जाताना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला राष्ट्रपतींनी त्या महिलांना दिला. राष्ट्रपतींना हृदयविकार आहे. तरीदेखील त्यांनी बुडणाऱ्या महिलांचे प्राण वाचवले.

Recent Posts