loader
Foto

Coronavirus vaccine करोनाशी लढाई; जगभरातील लस कंपन्यांकडे पाच अब्ज लशींची नोंदणी

 

वॉशिंग्टन: जगभरात हाहाकार माजवणाऱ्या करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहेत. करोनाच्या आजाराविरोधात लढण्यासाठी लस विकसित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. रशियाने करोनावर लस सापडली असल्याची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे चीन, ब्रिटन आणि अमेरिकेच्या कंपन्यांकडूनही सुरू असलेली लस चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. जगभरात लस स्पर्धा तीव्र झाली असून आतापर्यंत पाच अब्ज लशींची नोंदणी करण्यात आली आहे.

विविध कंपन्यांच्या लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी सुरू असताना जवळपास ५. ६ अब्जाहून अधिक लशीची नोंदणी करण्यात आली आहे. पाश्चिमात्य देशांच्या प्रयोगशाळेत विकसित होत असलेल्या लशीची पहिल्या खेपेची बहुतांश नोंदणी अमेरिकेने केली आहे. सध्या जगभरात सहा लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. तर, मंगळवारी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी करोनाला अटकाव करणाऱ्या 'स्पुटनिक व्ही' (Sputnik V) या रशियन लशीची घोषणा केली.

करोनाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्यासाठी कंपन्यांना आर्थिक मदतही मिळत आहे. या वर्षाखेरीस अथवा पुढील वर्षी लशीचे उत्पादन सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. करोना लस मोठ्या प्रमाणावर खरेदी करणाऱ्यांमध्ये अमेरिका, ब्रिटन, युरोपीयन महासंघ आणि जपान यांचा समावेश आहे. यामध्ये युरोपीयन महासंघाच्या ७० कोटी, ब्रिटन २५ कोटी, जपान ४९ कोटी डोसचा समावेश आहे. तर, रशियाकडे २० देशांनी एक अब्ज डोसची मागणी नोंदवली आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. त्याशिवाय भारतातही 'स्पुटनिक व्ही' (Sputnik V) या लशीच्या उत्पादनाबाबतही चर्चा सुरू आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूटच्यावतीने सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करत असलेल्या लशीचे उत्पादन करण्यात येत आहे. अमेरिकेने आपल्याच देशात विकसित होत असलेल्या मॉडर्ना इंक, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन यासारख्या कंपन्यांकडे कोट्यवधी लशी मागणी नोंदवली आहे.
 

दरम्यान, जगभरात करोनाबाधितांची संख्या आता दोन कोटींच्या घरात पोहचली आहे. यातील बहुतांशी बाधित हे अमेरिका, ब्राझील, भारत या देशांतील आहेत. तर, आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते ही संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. जवळपास ४० टक्के नागरिकांमध्ये कोविड-१९ ची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे संसर्गबाधितांची संख्या मोठी असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Recent Posts