loader
Foto

Coronavirus updates करोनाचे थैमान: अमेरिकेने ओलांडला ५० लाख बाधितांचा आकडा

वॉशिंग्टन: जागतिक महासत्ता असणारी अमेरिका करोनाच्या थैमानासमोर हतबल झाल्याची परिस्थिती आहे. करोना संसर्गाचे मुख्य केंद्र झालेल्या अमेरिकेत बाधितांच्या संख्येने ५० लाखांचा आकडा ओलांडला आहे. रविवारी अमेरिकेत ५० लाख करोनाबाधितांची संख्या नोंदवण्यात आली. जगभरातील देशांमध्ये ही सर्वाधिक बाधितांची संख्या आहे.

रविवारी अमेरिकेत एकाच दिवसांत ४८ हजार नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. अमेरिकन आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, करोनाची कमी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, या रुग्णांची ओळख न पटल्यामुळे अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अमेरिकेत ही संख्या मोठी असून जवळपास पाच कोटी नागरिकांना करोनाची सौम्य लक्षणे असू शकतात अशी शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अमेरिकेत दरदिवशी सरासरी ५० हजार नवीन करोनाबाधित आढळत आहेत. तर, दुसरीकडे युरोपमध्ये सध्या करोनावर नियंत्रण मिळवले असल्याचे समोर आले आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जगभरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, करोनाला अटकाव करणारी लस विकसित झाल्यानंतर करोना लगेच जाईल अशी अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. करोनाची लस ही जादूची लस नसणार. त्यामुळे करोनाविरोधात सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्योसिस यांनी म्हटले.

अमेरिकेतील संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांचे सल्लागार डेविड मॉरेंस यांनी सांगितले की, लस विकसित करण्याचा प्रयत्न हे अंधारात बाण मारण्यासारखे आहे. सुरुवातीच्या टप्प्यात लस चाचणीचे परिणाम चांगले येतात. मात्र, अंतिम टप्प्यातही लस चाचणीचे चांगले, सकारात्मक परिणाम येतीलच याची काही खात्री नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पहिल्याच टप्प्यात आम्ही यशस्वी होऊ आणि येत्या काही महिन्यात आपल्याकडे लस असेल असा विश्वासही मॉरेंस यांनी व्यक्त केला.

Recent Posts