loader
Foto

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन; पाकिस्तानची पोटदुखी सुरू

इस्लामाबाद: सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्येत आज राम मंदिराचे भूमिपूजन सोहळा पार पडत असताना पाकिस्तानची पोटदुखी समोर आली आहे. पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री शेख रशीद अहमद यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्यावर भारतावर टीका केली आहे. भारत आता धर्मनिरपेक्ष राहिला नसून 'राम नगर' झाला असल्याची टीका केली आहे.

मंगळवारी एका व्हिडिओद्वारे शेख रशीद अहमद यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. त्यांनी म्हटले की, जगाच्या नकाशावरून आता एक सर्वात जुने धर्मनिरपेक्ष राष्ट्र हटले आहे. भारत आता हिंदुत्ववादी देश झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे. काश्मीरच्या मुद्यावर शेख यांनी भारतावर टीका केली. काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर भारतात मुस्लिमांवर अत्याचार सुरू असून त्यात वाढ झाली आहे. पाकिस्तान आणि जगभरातील मुस्लिम काश्मिरी जनतेसोबत असल्याची टिमकी त्यांनी वाजवली.

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू, शीख व अन्य समुदायांवर हल्ले होत आहेत. अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळावर पाकिस्तानमधील धार्मिक कट्ट्ररवाद्यांकडून हल्ले सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी इम्रान खान यांच्या सरकारने श्रीकृष्ण मंदिरासाठी निधी दिल्यानंतर मुस्लिम धार्मिक कट्टरवाद्यांनी सरकारवर टीका केली होती. त्याशिवाय, गुरुद्वाराही काही कट्टरवाद्यांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त समोर आले होते.

रशीद यांची मुक्ताफळे
मागील वर्षी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर शेख रशीद यांनी भारताला धमकी दिली होती. पाकिस्तानकडे अणूबॉम्ब असून भारतावर आम्ही हल्ला करू शकतो, अशी धमकी दिली होती.

दरम्यान, बुधवारी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडतोय. या सोहळ्याची सुरुवात मंगळवारपासूनच करण्यात आली. मंगळवारी सर्व प्रमुख देवदेवतांना आमंत्रित करण्यासाठी 'रामार्चन' पूजा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. या दरम्यान शरयू नदी, हनुमान गढी आणि श्रीरामजन्मभूमी या तीन ठिकाणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भेट देणार आहेत. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांसोबत देशभरातील १७५ मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांपैकी १३५ जण विविध पंथ आणि परंपरांचे पालन करणारे साधू, संत आहेत. पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांची अयोध्येला पहिलीच भेट असून, बुधवारी ते अयोध्येत तीन तास असणार आहेत. अयोध्येत दाखल झाल्यावर सर्वप्रथम ते शरयू नदीचे पूजन करतील. त्यानंतर हनुमानगढीचे दर्शन घेऊन श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी हनुमानाचे आशीर्वाद घेतील. हनुमानगढीनंतर मोदी श्रीराम जन्मभूमीवर दाखल होतील.

Recent Posts