loader
Foto

India China लडाखमध्ये चीन पुन्हा आगळीक करणार? सुरू आहे 'ही' तयारी!

बीजिंग: चीनने लडाखच्या पूर्व भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडत भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. मागील महिन्यात गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर वाढलेला तणाव निवळण्यासाठी भारत-चीन दरम्यान चर्चा सुरू असताना लडाखमध्ये चीन पुन्हा आगळीक करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

भारत-चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू असली तरी चीन अद्यापही पँगोग सो सरोवर परिसरातील फिंगर ४ ते ८ दरम्यान असलेले सैन्य मागे घेण्यास राजी नाही. त्यातच आता चीनने अक्साई चीन भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य जमवण्याची तयारी सुरू केली आहे. सॅटेलाइटद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रातून हा उलगडा झाला आहे. सैतुला भागात चीनने अत्याधुनिक घातक शस्त्रे तैनात केली आहेत.

ओपन सोर्स इंटेलिजेन्से अॅनालिस्ट Detresfa कडून सॅटेलाइट छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. चीनने मागील दोन वर्षात या ठिकाणच्या सैनिकी तळाला 'किल्ल्या'सारखे स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. सैतुलामध्ये चिनी सैन्य अधिक काळ वास्तव्य करू शकतील आणि लडाखमध्ये वेगाने जाऊ शकतील यासाठीच्या प्रशिक्षणाची तयारी सुरू केली आहे. चीनने नुकतेच नवीन हेलिपोर्ट तयार केले असल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय, सैतुलामध्ये चीनने तोफा आणि अन्य काही घातक शस्त्रे तैनात केले आहेत.

चीनने भारतालगतच्या सीमेजवळ कमीत कमी आठ हवाई तळ अथवा हेलिपॅड सक्रिय केले आहेत. याद्वारे युद्धजन्य परिस्थितीत तातडीने हालचाल करता येऊ शकतात. त्याशिवाय नुकतेच शिनजियांग प्रांतातील होटान हवाई तळावर तैनात करण्यात आलेल्या फायटर जेट आणि अवाक्स विमानांची सॅटेलाइट छायाचित्रे समोर आली आहेत. यामध्ये हवाई तळाशी संबंधित एअरक्राफ्टबाबत माहिती देण्यात आली आहे.

अत्याधिक उंचीवर हे ठिकाण असल्यामुळे चीन या भागात भारताच्या तुलनेत कमजोर आहे. तर, भारतीय हवाई तळ फार उंचावर नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने चीनविरोधात कारवाई करू शकतो. चीनने आपल्या ठिकाणांवर शेनयांग जे ११ फायटर जेट तैनात केले आहेत. ३५३० किमी अंतरावर हे विमान मारा करू शकतात. तर, २५०० किमी प्रतितास वेगाने उड्डाण घेऊ शकतात. सध्या चीनकडे अशाप्रकारची २५० हून अधिक विमाने आहेत. ही विमाने रशियाच्या एसयू २७ एसके या विमानांची चिनी आवृत्ती आहे.

दरम्यान, हेरगिरी करणारा भारताचा एक उपग्रह नुकताच चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटवरून गेला. या उपग्रहाने बरीच माहिती गोळा केली आहे. त्यानंतर चीनमध्ये खळबळ उडाली आहे. भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) चा हा उपग्रह EMISAT गुप्त माहिती गोळा करण्याचे काम करतो. यात ELINT म्हणजेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजेंस सिस्टम 'कौटिल्य' बसवण्यात आले आहे. ज्यात संरक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण माहिती एकत्रित करण्याची क्षमता आहे. अरुणाचल प्रदेश जवळील तिबेटच्या त्या भागावरून हा उपग्रह नुकताच गेला जिथे पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) कब्जा केलेला आहे.

Recent Posts