loader
Foto

Ram Mandir ५ ऑगस्टला न्यूयॉर्कमध्येही होणार 'जय श्रीराम'चा जयघोष

न्यूयॉर्क: अयोध्येत पाच ऑगस्ट रोजी राम मंदिराचे शिलान्यास होत असताना न्यूयॉर्कमध्ये जय श्रीरामचा जयघोष होणार आहे. न्यूयॉर्कमधील सुप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमधील मोठ्या स्क्रिनवर प्रभू श्रीराम आणि भव्य राम मंदिराचे थ्रीडी चित्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. हिंदू धर्मीयांसाठी ऐतिहासिक असणाऱ्या क्षणासाठी अमेरिकेतील हिंदू बांधव सज्ज असल्याचे आयोजकांनी सांगितले.

आयोजक जगदीश सेव्हानी यांनी सांगितले की, न्यूयॉर्कमध्ये पाच ऑगस्ट रोजीच्या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत मंदीर निर्माणासाठी शिलान्यास करतील तेव्हा न्यूयॉर्कमध्येही त्या क्षणाचा आनंद व्यक्त केला जाणार आहे. टाइम्स स्क्वेअरमधील मोठ्या नॅस्डॅक स्क्रीनशिवाय १७ हजार चौफूटांच्या एलईडी स्क्रिनवर थ्रीडी चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.

पाच ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते रात्री १० वाजेपर्यंत हिंदी आणि इंग्रजीत 'जय श्रीराम' ही अक्षरे दिसणार असून प्रभू राम यांचे चित्र आणि व्हिडिओ, मंदिराचा प्रस्तावित आराखडा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास करते वेळेची छायाचित्रे प्रदर्शित करण्यात येणार आहे. टाइम्स स्क्वेअरमधील बिल बोर्ड हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.

 

सेव्हानी यांनी सांगितले की, भारतीय समुदाय पाच ऑगस्ट रोजी हा क्षण उत्सवासारखा साजरा करणार आहेत. राम मंदिराचा शिलान्यास ही घटना ऐतिहासिक असून या क्षणाला आम्ही संस्मरणीय करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टशी संबंधित पुन्हा एक वाद उभा राहिला आहे. निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी पंतप्रधान कार्यालयाला नोटीस धाडली आहे. निर्वाणी आखाड्याचा सहभाग हा रामजन्मभूमी वादाच्या कायदेशीर लढाईत फारच महत्त्वाचा होता असे आखाड्याने नोटीशीत म्हटले आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये स्थान न मिळाल्याबाबत निर्वाणी आखाड्याने स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. येत्या २ महिन्यामध्ये आपल्या नव्या राम मंदिरात पुजारी म्हणून घेण्याचा निर्णय घेतला जावा अशी मागणी महंत धर्मदास यांनी केली आहे.

Recent Posts