loader
Foto

US China चीनविरोधात अमेरिका आक्रमकच; सिनेटमध्ये 'हे' विधेयक दाखल

वॉशिंग्टन: करोना साथीला जबाबदार असल्याबद्दल चीनविरोधात अमेरिकी नागरिकांना खटला दाखल करण्याची परवानगी देण्याची तरतूद असलेले विधेयक रिपब्लिकन पक्षाच्या काही सिनेटरनी सादर केले आहे. अमेरिकी नागरिकांना फेडरल कोर्टात चीनविरोधात खटला दाखल करण्याची परवानगी देण्याची तरतूद या विधेयकात आहे. सिनेटर मार्था मॅकसॅली, मार्शा ब्लॅकबर्न, टॉम कॉटन, जॉश हॅवले, माइक राउंड्स आणि थॉम टिलिस यांनी हे विधेयक सादर केले आहे. करोना साथीस जबाबदार असल्याबद्दल चीनविरोधात खटला भरण्याची तरतूद यात आहे. याशिवाय, फेडरल कोर्टांना चिनी मालमत्ता जप्त करण्याचे अधिकारही या विधेयकात देण्यात आले आहेत.

'चिनी कम्युनिस्ट पक्षाचा खोटेपणा आणि कपटाचा बळी ठरलेले अमेरिकी नागरिक, नातेवाइक गमावलेले नागरिक, व्यावसायिक नुकसान झालेले नागरिक; तसेच कोव्हिड-१९मुळे वैयक्तिक नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाईसाठी चीनविरोधात खटला भरण्याची संधी मिळालया हवी,' असे सिनेटर मॅकसॅली यांनी सांगितले. करोना साथ लपवण्याचे; तसेच आता या साथीच्या काळात नफेखोरी करण्याचे परिणाम चीनला भोगावेच लागतील, असे ब्लॅकबर्न यांनी सांगितले.

 

'चीनने प्रादुर्भाव रोखला नाही': 'कोव्हिड-१९ आजाराबद्दल चीन पारदर्शक नाही; तसेच चीनला जगात करोना विषाणूचा प्रसार रोखता आला असता. मात्र, त्यांनी प्रसार न रोखण्याचा पर्याय निवडला,' असा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. करोना साथीच्या नियंत्रणावरून ट्रम्प यांनी यापूर्वीही चीनवर टीका केली आहे. करोनामुळे जगभरात सहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी अमेरिकेत १ लाख ४३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सुमारे एक कोटी ४० लाख लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ४० लाख रुग्ण अमेरिकेत आहेत. करोना विषाणूची साथ लपवण्याचा प्रयत्न केल्याचा अमेरिकेचा आरोप चीनने फेटाळून लावला आहे.

चिनी कंपन्यांवर निर्बंध: चीनच्या शिनजांग प्रांतात मुस्लिम नागरिकांवर अत्याचार केल्याच्या तक्रारीनंतर अमेरिकेने ११ चिनी कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. शिनजांग प्रांतात सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना अटक केली आहे; तसेच मुस्लिम नागरिकांवर अत्याचार केले जात आहेत. मानवाधिकार, व्यापार आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात शिनजांगमध्ये संघर्ष सुरू आहे. या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनचे संबंध खालावले आहेत. या आरोपानंतर ट्रम्प प्रशासनानेही चार अमेरिकी कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत.

Recent Posts