loader
Foto

अमेरिकेतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर?; २४ तासात ६८ हजार बाधित, ९०० जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनाचे थैमान सुरूच असून बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील २४ तासात ६८ हजारांहून अधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. तर, ९७४ करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील करोनाबाधितांची संख्या ३५ लाखांहून अधिक झाली आहे. त्यामध्ये एक लाख ३८ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या एक कोटी ३० लाखांहून अधिक झाली असून ५ लाख ६० हजारजणांना प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिकेत लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने लोक घराबाहेर पडत आहेत. यामध्ये युवकांची संख्या अधिक आहे.

जगभरातील २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनावर नियंत्रण ठेवण्यास काही मोजक्याच देशांना यश आले आहे. अमेरिका, ब्राझील आणि भारतामध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. अमेरिका आणि भारतातील एकत्रित करोनाबाधितांची संख्या एक लाखाच्या आसपास जाते. तर, ब्राझीलमध्ये ही दररोज सरासरी ३० हजार करोनाबाधित आढळत आहेत.

अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या ३५ लाखांहून अधिक नोंदवण्यात आली आहे. तर, दुसरीकडे भारतातील करोनाबाधितांच्या संख्येनेही १० लाखांचा आकडा ओलांडला आहे. तर, ब्राझीलमध्येही करोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या घरात पोहचली आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये करोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६० टक्क्यांहून अधिक आहे. ब्राझीलमध्ये करोनाच्या संसर्गामुळे जवळपास ७० हजार नागरिकांचा मृत्यू झाला असून भारतात जवळपास २५ हजार नागरिकांना प्राण गमवावे लागले.

दरम्यान, भारतात, रुग्ण संख्येने १० लाखांचा आकडा ओलांडला असला तरी आजारावर मात करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. देशात करोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ६३.२५ टक्के इतके झाले आहे. करोनाचे बहुतेक रुग्ण हे सौम्य लक्षण असलेले आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी फक्त ०.३२ टक्के रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. तर ३ टक्क्यांहून कमी रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली. तसंच भारत करणावर विजय मिळवण्याच्या जवळ आहे, असा दावाही त्यांनी केला.

तर, दुसऱ्या बाजूला करोनाला अटकाव करणाऱ्या लशींच्या चाचणीबाबत सकारात्मक वृत्त आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या करोना लशीची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या लशीची अंतिम टप्प्यातील चाचणी २७ जुलैैपासून सुरू होणार आहे.

Recent Posts