loader
Foto

अमेरिकेमुळे करोनाचा फैलाव; २० अब्ज डॉलरच्या नुकसान भरपाईची मागणी

लाहोर: जगभरात करोनाच्या संसर्गासाठी अमेरिका चीनला जबाबदार ठरवत आरोप करत आहे. तर, आता दुसरीकडे अमेरिकेमुळे करोनाचा संसर्ग जगभरात फैलावला असल्याचा दावा करत अमेरिकेविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अमेरिकेने नुकसान भरपाई म्हणून २० अब्ज डॉलर देण्याची मागणी पाकिस्तानमधील एका नागरिकाने याचिकेद्वारे केली आहे. ही याचिका दाखल करून घेताना लाहोरच्या कोर्टाने अमेरिकेच्या वाणिज्य दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.

लाहोर येथील नागरीक रझा अली यांनी ही याचिका इस्लामाबादमधील कनिष्ठ कोर्टात दाखल केली आहे. करोनाच्या संसर्गामुळे याचिकाकर्त्याला आणि पाकिस्तानला झालेल्या नुकसानीसाठी अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला. आपले कुटुंबीय करोनाच्या संसर्गामुळे बाधित असून त्यांची प्रकृती बिघडली असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

अमेरिकेने करोनाचा संसर्ग वेगाने फैलावला. अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे पाकिस्तानसह संपूर्ण जगात करोनाचा हाहाकार अधिक प्रमाणात सुरू झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याशिवाय सध्याचे अमेरिकेतील सरकार हे करोनाला अटकाव करणाऱ्या जागतिक पातळीवरील प्रयत्नांमध्ये अडथळे आणत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेकडून २० अब्ज डॉलरची नुकसान भरपाई घेण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. न्या. कामरान करामात यांनी अमेरिकन दूतावास, अमेरिकन महावाणिज्यदूत, अमेरिकन संरक्षण मंत्री ( वाणिज्य दूतावासामार्फत) आणि परराष्ट्र मंत्रालयाला नोटीस दिली आहे. कोर्टाने सात ऑगस्टपर्यंत उत्तर मागितले आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पाकिस्तानमध्ये करोनाबाधितांची संख्या दोन लाख ४० हजारांहून अधिक झाली आहे. तर, त्यातील पाच हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सोशल डिस्टेंसिंगचा अवलंब करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. अमेरिकेने ईदनिमित्त पाकिस्तानला करोनाविरोधात लढण्यासाठी पॅकेजची घोषणा केली होती.

Recent Posts