loader
Foto

Coronavirus करोना महासंकटाची टांगती तलवार; WHO ने दिला 'हा' इशारा

जिनिव्हा: जगभरातील अनेक देशांमध्ये करोना संसर्गाचा कहर सुरू आहे. काही मोजक्या देशांना करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यास यश आले असले तरी अनेक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनाचा जोर ओसरणे तर दूर अद्याप संसर्गाने उच्चांक गाठला नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. जगभरातील देशांनी निर्देशांचे योग्य पालन न केल्यास करोनाचे संकट अधिकच गडद होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी दिला आहे.

करोनाचा संसर्ग लवकरात लवकर संपावा अशी आमची इच्छा असल्याचे टेड्रोस घेब्रेयेसस यांनी एका व्हर्चु्अल बैठकी दरम्यान सांगितले. करोनावर मात करून पूर्वी सारखं आयुष्य जगण्याची सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, करोनाची महासाथ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने आपण खूप दूर असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक पातळीवर करोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये परस्पर अविश्वास, एकजूट नसणे अशा अनेक कारणांमुळे करोना संसर्गाचा वेग वाढत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास करोनाचा जोर आणखी वाढणार असून महासंकटाची टांगती तलवार असल्याचे त्यांनी सांगितले. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी करोना नियंत्रणासाठी जर्मनी, दक्षिण कोरिया आणि जपान सरकारचे कौतुक केले.

काही दिवस आधी, जगभरात करोनामुळे गंभीर परिस्थिती असताना जागतिक आरोग्य संघटनेने संसर्गाच्या मुद्यावर नेत्यांनी राजकारण न करण्याचे आवाहन केले होते. करोनापेक्षा जागतिक पातळीवरील एकजुटी अभाव हाच मोठा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले होते. करोनाचा आपण सामना करत असलो तरी सगळ्यात मोठा धोका जागतिक एकजूट नसणे आणि जागतिक पातळीवर नेतृत्वाची कमतरता असणे हे दोन मोठे संकट सध्या आहे. दुभंगलेल्या जगासह आपण करोना महासाथीच्या आजारावर मात करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत नाट्यमयरित्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळे रुग्णालयांवर ताण आला आहे. आतापर्यंत ४,३०० बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विविध देशांत जुलै आणि ऑगस्टमध्ये बाधितांची संख्या वाढू शकते, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

चीनमधील वुहान शहरात डिसेंबर २०१९ च्या अखेरीस करोनाबाधित रुग्ण आढळला असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर चीनमध्ये करोनाचा संसर्ग वेगाने फैलावला. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, एक कोटी ८० हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यातील पाच लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ५४ लाखांहून अधिकजणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे.

Recent Posts