loader
Foto

China Dispute चीनच्या बॉम्बरला जपानच्या हवाई दलाने पिटाळून लावले

टोकियो: चीनच्या आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे आशिया खंडात तणाव निर्माण होत आहे. लडाखमध्ये भारताच्या हद्दीत घुसखोरी केल्यानंतर चीनने जपानचे नियंत्रण असलेल्या बेटावर दावा केला. चीनच्या या दाव्यावरून जपान आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाला आहे. अशातच आता जपानच्या हवाई दलाने चीनच्या बॉम्बर विमानाला आपल्या हवाई हद्दीतून पिटाळून लावले असल्याचे समोर आले आहे.

चीन आणि जपानमध्ये मागील काही दिवसांत तणाव वाढला आहे. पूर्व चीन समुद्रात जपानचे नियंत्रण असलेल्या ओकिनावा आणि मियाको या बेटादरम्यान, चीनच्या एच-६ स्ट्रेटेजिक बॉम्बर आढळले. त्यानंतर जपानच्या एफ-१६ फायटर जेट्सने या बॉम्बरला पिटाळून लावले असल्याची माहिती जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. काही दिवसआधी चीनच्या पाणबुडीने जपानच्या हद्दीत प्रवेश केला होता. त्यानंतर जपानी नौदलाने पाणबुडीला हुसकावून लावले होते.

चीनच्या एच-६ बॉम्बरमध्ये दूर अंतरावरील लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता आहे. त्याशिवाय अणवस्त्र हल्ल्याची क्षमता या बॉम्बरमध्ये आहे. अमेरिकेच्या तळावर हल्ला करण्यासाठी चीनने आपल्या ताफ्यात याचा समावेश केला असल्याचे म्हटले जाते. याआधी या बॉम्बरमध्ये फक्त क्षेपणास्त्रद्वारे हल्ला करण्याची क्षमता होती. मात्र, त्यानंतर त्याला अद्यावत करण्यात आले.

बेटाच्या दाव्यावरून चीन-जपानमध्ये वाद
चीनने पूर्व चीन समुद्रातील बेटावर आपला दावा सांगितला आहे. सध्या हे बेट जपानच्या ताब्यात असून सेनकाकू आणि चीनमध्ये डियाओस या नावाने ओळखले जाते. या बेटांचा ताबा १९७२ पासून जपानकडे आहे. हे बेट आपल्या हद्दीत येत असल्याचा दावा चीन करत असून जपानने या बेटावरील दावा सोडण्याची मागणी केली आहे. या बेटासाठी जपानवर सैनिकी कारवाई करण्याची धमकी चीनने दिली आहे.

जपान नौदलाकडून संरक्षण
सेनकाकू या बेटाचे संरक्षण जपानचे नौदल करते. त्यामुळे या बेटावर चीनने लष्करी कारवाईने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जपानसोबत युद्ध करावे लागणार आहे. चीनची पाणबुडी या भागात आल्यामुळे दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदी महासागरामध्ये भारत आणि जपानच्या नौदलाच्या युद्धनौकांनी शनिवारी सराव केला. दोन्ही देशांच्या दोन युद्धनौका सरावामध्ये सहभागी झाल्या होत्या. जपानने परस्परसामंजस्य अधिक वाढविण्यासाठी सराव करीत असल्याचे म्हटले आहे. भारत आणि जपानच्या नौदलांमध्ये नियमितपणे युद्धसराव होतात. पण, शनिवारी झालेल्या युद्धसरावाला भारत आणि चीनमधील तणावाची पार्श्वभूमी होती.

Recent Posts