loader
Foto

भारताचा माझं सरकार पाडण्याचा डाव; दिल्लीत बैठका : केपी शर्मा ओली

काठमांडू : भारताकडून माझं सरकार पाडण्याचा डाव असून यासाठी दिल्लीत बैठका होत आहेत, असा सनसनाटी आरोप नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी रविवारी केला. नेपाळमधील दिवंगत कम्युनिस्ट नेते मदन भंडारी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा आरोप केला. नेपाळ सरकारकडे संसदेत पूर्ण बहुमत आहे. त्यामुळे कुणी काहीही नियोजन केलं तरी ते यशस्वी होणार नाही, असंही ओली म्हणाले.

'दिल्लीतून याबाबत एक बातमी येत आहे. नेपाळने सुधारित नकाशासाठी जी घटनात्मक दुरुस्ती केली त्याबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत बैठका होत आहेत,' असं म्हणत हा माझा सरकार पाडण्याचा डाव असल्याचा आरोप ओलींनी केला. नेपाळने आपल्या सुधारित नकाशात भारताचे भाग असलेले लिम्पियाधुरा, कालापानी आणि लिपुलेख यांचाही समावेश केला आहे, ज्याला घटनात्मक दुरुस्तीद्वारे नेपाळच्या संसदेने मंजुरी दिली. या विधेयकावर नेपाळच्या राष्ट्रपती बिद्या देवी भंडारी यांनी १८ जूनला स्वाक्षरी केली.

नेपाळने प्रादेशिक रचना ठामपणे सांगितल्यामुळे भारताला राग आहे, असंही ओली म्हणाले. 'नेपाळचा राष्ट्रवाद एवढा कमकुवत नाही. आम्ही आमचा नकाशा बदलला आहे आणि देशाच्या पंतप्रधानालाच काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तर ते नेपाळसाठी अकल्पनीय असेल', असं ते म्हणाले. काही लोकांच्या मते नेपाळचा नवा नकाशा हा गुन्हा आहे, असं म्हणत त्यांनी भारताकडे बोट केलं. '२०१६ मध्येही मी चीनच्या जवळ गेल्यामुळे बाहेरुन माझं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला होता. चीनसोबत वाहतूक करार केला, ज्यामुळे भारतावरील अवलंबत्व कमी झालं आहे', असं ते म्हणाले.

'पंतप्रधानांना १५ दिवसात काढलं जाईल असं तुम्ही ऐकलं असेल. पण अशा वेळेला मला काढून टाकलं तर नेपाळच्या बाजूने बोलण्याची हिंमत कुणीही करणार नाही. कारण, त्या व्यक्तीलाही तातडीने काढून टाकलं जाईल. मी स्वतःसाठी बोलत नाही. मी देशासाठी बोलतोय. आपला पक्ष, आपले संसदीय पक्ष या जाळ्यात अडकणार नाहीत. ज्यांना प्रयत्न करायचे आहेत, त्यांना करू द्या', असं ओली म्हणाले.

नेपाळमध्ये अंतर्गत धुसफूस
ओली यांनी नवा नकाशा जारी करुन देशवासियांना खुश करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्याच पक्षात फूट आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीला ओलींनी हजेरी न लावल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली. नेपाळमधील करोना परिस्थिती हाताळण्यावरुन स्वतःच्या पक्षातीलच नेते ओलींवर नाराज आहेत. स्थायी समितीतील ४४ पैकी ३० सदस्य उपअध्यक्ष पुष्पा कमल दहल यांच्यासोबत असल्याची माहिती आहे, जे ओलींसाठी एक आव्हान आहे.

नव्या नकाशावरुन नेपाळमधील राजकीय पक्षांमध्येच मतभेद समोर आले होते. त्यातच केपी शर्मा ओली यांच्याविरोधातही आघाडी उघडण्यात आली. कारण, ते देशाचे पंतप्रधान असून पक्षाचं अध्यक्षपदही सांभाळत आहेत. दुसरीकडे प्रचंड या ओली यांच्याएवढ्या लोकप्रिय नसल्या तरी त्यांना विरोधक आणि संसदेतील मधेसी सदस्यांचा पाठिंबा आहे.

Recent Posts