loader
Foto

जादूई मास्क...करोना विषाणूचा ९९ टक्के खात्मा करणार!

 

जेरुसलेम: करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरातील अनेक देश चिंतेत आहेत. तर, दुसरीकडे करोनाच्या विषाणूला अटकाव करण्यासाठी संशोधकांचे विविध प्रयत्न सुरू आहेत. करोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क, फेसशिल्डचा वापर करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. मात्र, एका कंपनीने मास्कमुळे करोना विषाणूचा ९९ टक्के खात्मा होत असल्याचा दावा केला आहे. इस्रायलमधील Sonovia या कंपनीने हा खास मास्क बनवला आहे.

इस्त्रायलच्या या कंपनीने खास झिंक ऑक्साइड नॅनो पार्टिकलचं कोटिंग या मास्कवर केले आहे. त्यामुळे ९९ बॅक्टेरिया आणि व्हायरस निष्क्रिय होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शांघायमधील मायक्रोस्पेक्ट्रम लॅबमध्ये या मास्क चाचणी घेण्यात आली आहे. त्या चाचणीतही व्हायरस ९० टक्क्याहून अधिक प्रमाणात निष्क्रिय होत असल्याचे समोर आले आहे.

कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी लीट गोल्डहॅम्मर यांनी सांगितले की, येत्या काही आठवड्यात या रुग्णालयात वापरण्यात येणारे कपडे, संरक्षक उपकरण, कपडे आदींमध्ये फॅब्रिकचा वापर करण्यात येणार आहे. जर्मनी आणि अमेरिकेतील काही कंपनी आणि रुग्णालयांकडून मागणी करण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या खास झिंक ऑक्साइडच्या मास्कची ऑस्ट्रियातही चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत सार्स-कोविड व्हायरसशी साधर्म्य असणाऱ्या विषाणूंचा वापर करण्यात आला होता. या चाचणीतही मास्कचा परिणामकारक असल्याचे समोर आले.

दरम्यान, चीनमधील संशोधकांनी शनिवारी लशीची दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू केली. सहा संभाव्य लशींची चाचणी चिनी संशोधक मानवावर घेत आहेत. यापूर्वी मेपासून पहिल्या टप्प्यात २०० जणांवर चाचणी घेण्यात आली आहे, असे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल बायोलॉजीने रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. दुसऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये लशीचा डोस निश्चित केला जाईल, तसेच संभाव्य लस निरोगी व्यक्तीच्या शरीरात सुरक्षितपणे प्रतिकारशक्ती वाढवते का, हे पाहिले जाणार आहे.

जगभरात २०० हून अधिक देशांमध्ये करोनाच्या संसर्गाने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये करोनाची पहिली लाट ओसरलीदेखील नसताना जवळपास ८१ देशांमध्ये करोनाची लाट आल्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. मागील काही दिवसांपासून चीनमध्येही करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. ब्राझीलसह दक्षिण अमेरिका, दक्षिण आशियात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे.

Recent Posts