loader
Foto

India-China : चीनच्या या धोक्यापासून सावध राहा; ऑस्ट्रेलियाने केलं सतर्क

कॅनबेरा : चीनच्या कुरापतींचा सामना करत असलेला भारत एकमेव देश नाही. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनीही शुक्रवारी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. आपलं सरकार आणि देशातील काही खाजगी संस्थाही चीनच्या सायबर अटॅकच्या रडारवर होत्या, असं ते म्हणाले. त्यांनी थेट नाव न घेता या हल्ल्यांसाठी चीनकडे बोट केलं. गेल्या आठवड्यात व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयानेही चीनवर आरोप केला होता. व्हिएतनामच्या मासेमारी बोटीवर चीनच्या दोन जहाजांकडून दक्षिण चीन समुद्रात हल्ला करण्यात आला होता.

व्हिएतनाम सरकारच्या माहितीनुसार, ही घटना पार्सल बेटाजवळ घडली. हे बेट आपलं असल्याचा दावा चीनचा आहे. या बेटाजवळ चीनने बोट जप्त केल्यानंतर एप्रिलमध्ये व्हिएतनामने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. गुरुवारी जपाननेही चीनविरोधात राग व्यक्त केला. चीनने पूर्व चीन समुद्रातील सेनकाकू बेटाजवळ चीनला त्रास देण्यासाटी ६६ दिवस जहाज तैनात केलं होतं, असं जपानने म्हटलं आहे. तर दुसरीकडे इंडोनेशियाकडूनही असाच आरोप चीनवर केला जात आहे.

ऑस्ट्रेलियन सायबर तज्ञांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर मी आज तुम्हाला एक सल्ला देत आहे. ऑस्ट्रेलियन संस्था सध्या एका प्रभावी देशातील सायबर तज्ञांकडून लक्ष्य केल्या जात आहेत, असं स्कॉट मॉरिसन म्हणाले. कॅनबेरामध्ये वार्ताहरांशी बातचीत करताना त्यांनी हा इशारा दिला. सायबर हल्ल्यांचं प्रमाण वाढत असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्र्यांनीही दिली.

जपानच्या हद्दीतील आऊटसुरी बेटाच्या वायव्येला जपानचे चार जहाज १८ मैलापर्यंत आत आले होते आणि हे जहाज नैऋत्येकडे वाटचाल करत होते, अशी माहिती जपानच्या नौदलाने दिली. १४ एप्रिलपासून जपानच्या पाण्यात दररोज चिनी जहाज दिसून येत आहेत. दुसरीकडे चीन आणि मलेशियाच्या जहाजांमध्येही दक्षिण चीन समुद्रातील बोर्नियो बेटाजवळ संघर्ष झाला होता.

दक्षिण चीन समुद्राशी संबंधित जवळपास सर्वच देशांना चीनचा त्रास आहे. जपानसारख्या देशानेही चीनविरोधात या तक्रारी केल्या आहेत. वैतागलेल्या तैवानने बुधवारी चीनच्या वायू सेनेला कठोर शब्दात इशारा दिला होता. सर्व देश करोना संकटाचा सामना करत असताना चीन प्रादेशिक रचना बलण्यासाठी प्रयत्न करत आहे. चीन विविध ठिकाणी दावा करत असलेला भाग चीनच्या आकारापेक्षाही मोठा आहे. चीनची सीमा १४ देशांसोबत आहे, पण एकूण २३ देशांच्या विविध भागावर चीनकडून दावा केला जातोय.

Recent Posts