loader
Foto

Covid Vaccine : लस तयार होण्यापूर्वीच श्रीमंत देशांच्या कोट्यवधींच्या ऑर्डर; भारताचं काय?

करोनावर लस शोधण्याच्या शर्यतीत गरीब देश मागे पडण्याची भीती कल्याणकारी संघटनांना वाटते आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर आधी आपल्या नागरिकांना देण्याची ग्वाही श्रीमंत देशांनी दिली आहे. करोनाची साथ संपेपर्यंत गरीब देशांतील लोकांना ही लस मिळेल का, अशी साधार भीती या संघटनांनी व्यक्त केली आहे.

जूनच्या सुरुवातीच्या दिवसांत संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट या संघटनांनी लशीच्या उपलब्धतेबाबत काळजी व्यक्त केली होती. लोकांसाठीची लस सर्वांना उपलब्ध होणे, है नैतिक कर्तव्य आहे, असे या संघटनांनी म्हटले आहे. ही आदर्शवादी विधाने प्रत्यक्षात येत नाहीत, असा अनुभव आहे. धोरण आखून लशींचे वितरण न झाल्यास गोंधळ माजेल, अशी भीती या संघटनांना वाटते आहे. 'पूर्वी कंपन्यांनी लस उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्याचे पेटंट घेतल्याची उदाहरणे आहेत. लोकांसाठीच्या लशीला अशी खासगी मालकी परवडणारी नाही,' असे जीनिव्हातील मेडसिन्स सॅन्स फ्रंटियर्स या स्वयंसेवी संस्थेतील धोरण आणि विधी सल्लागार युआन क्विऑंग हू यांनी म्हटले आहे. घानाचे अध्यक्ष नाना अकुफो-अड्डो यांनीही लस परिषदेत याच मुद्द्यावर चिंता व्यक्त केली होती. सध्या सुमारे डझनभर लशी चाचणीच्या टप्प्यात आहेत. या लशींच्या उत्पादनावरच अमेरिका, ब्रिटनसारख्या श्रीमंत देशांनी कोट्यवधी डॉलर खर्ची घातले आहेत. सर्वांत आघाडीवर असलेल्या अॅस्ट्राझेन्का या अँग्लो-स्वीडिश कंपनीने तर अमेरिकेशी ३० कोटी लशी उपलब्ध करून देण्याचा करारच केला आहे. जर्मनी, फ्रान्स, इटली आणि नेदरलँड हेही ४० कोटी लशींची मागणी नोंदविण्याच्या बेतात आहेत. या स्थितीत गरीब देशांचे काय होणार, ही काळजी कल्याणकारी संघटनांना भेडसावत आहे.

भारतीयांना लस मिळणार?
भारतातही लस निर्मितीचे प्रयोग सुरू आहेत. ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या प्रयोगातील लस विकसित झाल्यानंतर भारतीयांनाही त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. 'अॅस्ट्राझेन्का' आणि सीरम इन्स्टिट्यूट यांच्यात बोलणी झाली असून, त्या अंतर्गत 'सीरम'ला एक अब्ज लशींचे उत्पादन करण्याची परवानगी देण्याचे 'अॅस्ट्राझेन्का'ने मान्य केले आहे.

शरीरातील नॅनो स्पंज करोनाशोषक
मानवी फुफ्फुसात आणि पेशा आवरणात असणारे नॅनो स्पंजसारखे घटक करोनाला शोषू शकतात आणि निकामी करू शकतात, असे अमेरिकी शास्त्रज्ञांना आढळले आहे. या माहितीमुळे करोनावरील औषधांच्या विकासप्रक्रियेला नवी दिशा मिळू शकेल, असेही शास्त्रज्ञांना वाटते आहे. 'नॅनो लेटर्स' नावाच्या विज्ञानपत्रिकेतील लेखा म्हटले आहे, की मानवी केसापेक्षाही हजार पटींनी लहान असणारे नॅनो स्पंज जीवाणू आणि विषद्रव्ये शोषू शकतात. कॅलिफोर्निया विद्यापीठातील वैज्ञानिकांनी मानवीपेशीतून हे नॅनो स्पंज मिळ‌विण्यात यश मिळ‌वले आहे.

'एचसीक्यू' मृत्यू रोखत नाही
'करोनाग्रस्तांचे मृत्यू रोखण्यात मलेरियावरील गुणकारी औषध असलेले हायड्रॉक्सिक्लोरोक्विन अपयशी ठरल्याचे आता ठामपणे सिद्ध झाले आहे,' असे जागतिक आरोग्य संघटनेतील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 'प्राथमिक टप्प्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या औषधाचा उपयोग होऊ शकतो; परंतु त्याबाबतही अजून चाचण्या सुरू आहेत,' असे डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे. आरोग्य संघटनेने नुकतीच हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचा वापर करोनाग्रस्तांसाठी करण्यावर बंदी घातली आहे.

तीन कंपन्यांना इशारा
अमेरिकेत करोना विषाणूसाठी घरी रक्त तपासणीची किट विकणाऱ्या तीन कंपन्या बेकायदा तपासणी करीत असल्याचे सांगत, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या कंपन्यांना अमेरिकेत चाचण्यांची परवानगी देण्यात आलेली नाही, असे अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने म्हटले आहे. मेडिकिट लि. (हाँगकाँग), अँटीबॉडीजचेक डॉट कॉम (संयुक्त अरब अमिरात) आणि सोनरिसा फॅमिली डेंटल ऑफ शिकागो अशी नोटीस बजावलेल्या कंपन्यांची नावे आहेत

Recent Posts