loader
Foto

juneteenth USA आजचा दिवस अमेरिकेत 'यासाठी' आहे खास!

 

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टुल्सा येथील निवडणूक प्रचार सभेत गोंधळ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत वर्णद्वेषी आंदोलन सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर सभेत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यानिमित्ताने अमेरिकेतील जूनटिंथ आणि टुल्सा येथील दंगलीची पुन्हा चर्चा सुरू झाली.

जॉर्ज फ्लाइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेत वर्णद्वेषाविरोधाती आंदोलन तीव्र झाले. या आंदोलनाच्या निमित्ताने अमेरिकेतील वर्णद्वेषीविरोधातील लढा पु्न्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. अमेरिकेत श्वेतवर्णीयांकडून कृष्णवर्णीयांचे झालेले शोषण, अत्याचाराच्या घटनांची आजही उजळणी करण्यात येते. अमेरिकेतील वर्णद्वेषी लढ्यासाठी १९ जून हा दिवस खास आहे. १९ जूनचा दिवस 'जूनटिंथ' म्हणून ओळखला जातो. टेक्सास राज्यात १९ जून १८६५ रोजी गुलामगिरी रद्द होत असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे हा दिवस अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या लढ्यातील महत्वाचा दिवस समजला जातो.

अमेरिकेत १९ जून ही राष्ट्रीय सुट्टी नसली तरी, ४५ राज्यांमध्ये या दिवशी सुट्टी करण्यात येते. अमेरिकेतील गुलामिरी संपुष्टात आणली गेली, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. अमेरिकेत या दिवसाला मुक्ती दिवस अथवा जूनटिंथ स्वातंत्र्य दिवस असे म्हटले जाते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी एक जानेवारी १८६३ रोजी यांनी अमेरिकेत गुलाम म्हणून असलेले नागरीक गुलामगिरीतून मुक्त असल्याचे जाहीर केले होते. मात्र, लिंकन यांच्या घोषणेनंतरही जवळपास दोन-अडीच वर्ष गुलामगिरी सुरू होती. अनेकांनी आपल्याकडील गुलामांची माहिती लपवून ठेवली होती. गुलामगिरीचे धंदे लपून सुरू होते. या गुलामांचा वापर शेतीसह इतर कामांसाठी करण्यात येत होता.

१९ जूनचे महत्त्व काय?
टेक्सासमध्ये मेजर जनरल गॉर्डन ग्रॅन्जप गॅलव्हस्टन यांनी १९ जून १८६५ रोजी नागरी युद्ध आणि गुलामगिरी दोन्ही समाप्त झाले असल्याची घोषणा केली. तेव्हापासून हा दिवस मुक्ती दिवस म्हणून ओळखला जातो. सर्व गुलाम मुक्त आहेत. सर्वांना नागरीक म्हणून अधिकार देण्यात आले आहेत. आता मालक आणि गुलाम हे संबंध संपुष्टात येत असून रोजगार देणारे आणि मजूर या अनु्षंगाने हे संबंध अस्तित्वात येणार आहेत. त्याशिवाय मजुरांना कामाचे वेतन देण्यात यावे अशी घोषणा त्यांनी केली. टेक्सासमध्ये १८६६ पासून हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, परेड आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

टुल्सा नरसंहार काय आहे?
टुल्सा हिस्टोरिकल सोसायटी अॅण्ड म्युझियमनुसार, पहिल्या महायुद्धानंतर टुल्सामध्ये आफ्रो अमेरिकन नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वस्ती होती. ग्रीनवुड जिल्ह्यातील 'ब्लॅक वॉल स्ट्रीट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणावर दंगल उसळली होती. कृष्णवर्णीय असणाऱ्या डीक रॉलँड या व्यक्तीला एका श्वेतवर्णीय महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर एका स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या अहवालाच्या अनुषंगाने चिथावणीखोर बातमीमुळे कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीयांमध्ये दंगल उसळली होती. यामध्ये कृष्णवर्णीयांचा मोठ्या प्रमाणावर नरसंहार करण्यात आला होता.

Recent Posts