loader
Foto

उत्तर कोरियाने संपर्क कार्यालय उडवले; उत्तर व दक्षिण कोरियामध्ये तणाव

सोल: गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या उत्तर आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांमधील वाद मंगळवारी पुन्हा विकोपाला गेले. उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंगने दक्षिण कोरियाला थेट युद्धाची धमकी दिल्यानंतर काही तासांतच उत्तर कोरियाने सीमेवरील दक्षिण कोरियाच्या संपर्क कार्यालयावर बॉम्ब टाकून ते उडवून दिले आहे. कराराद्वारे लष्करविहीन केलेल्या क्षेत्रात पुन्हा प्रवेश करण्याची धमकीही उत्तर कोरियाने केल्यामुळे दक्षिण आणि उत्तर कोरिया या शेजारील देशांमधील संबंध पुन्हा एकदा विकोपाला गेले आहेत.

सोलमधील सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवरील केसाँग भागातील दक्षिण कोरियाची इमारत दुपारी अडीच वाजता नष्ट करण्यात आली असून, या इमारतीतून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे वृत्तही स्थानिक माध्यमांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये सातत्याने वाद झडत असून, कारवाईची धमकी उत्तर कोरियाकडून वारंवार देण्यात येत होती. सीमेच्या परिसरात सामरिक हालचाली आणि कथित दुष्प्रचार करणे दक्षिण कोरियाने थांबविलेले नाही, असा उत्तर कोरियाचा आरोप आहे.

तणावाचा ताजा इतिहास
मागील काही महिन्यांपासून दक्षिण कोरियाच्या हद्दीतून उत्तर कोरियाविरोधात संदेश देणारे फुगे सोडण्यात येत आहेत. उत्तर कोरियातून पळून आलेल्या नागरिकांकडून हे कृत्य केले जात असल्याचे म्हटले जाते. फुगे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी किम जोंग यांची बहीण किम यो जोंगने दक्षिण कोरियाकडे केली होती. मात्र, त्याकडे दक्षिण कोरियाने दुर्लक्ष केले. त्यामुळे संतापलेल्या किम यो यांनी थेट युद्धाचीच धमकी दिली आहे.

किम यो यांची भूमिका निर्णायक
दक्षिण कोरियाबाबतच्या संबंधाचे निर्णय घेण्याबाबत किम यो यांची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे त्यांच्या या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. किम यो यांनी म्हटले की, 'आम्ही आता थेट कारवाईच करणार आहोत. आमचे सर्वोच्च नेते, आमचा पक्ष, देश आणि मिळालेल्या अधिकाराचा वापर करून शत्रूवर कारवाईचा आदेश देत आहे.'
 

Recent Posts