loader
Foto

करोनामुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये दोन बाधित रुग्ण आढळले

वेलिंग्टन: करोनाच्या संसर्गातून मुक्त झालेल्या न्यूझीलंडमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोन जणांना करोनाची बाधा झाली असून दोघेही जण नुकतेच ब्रिटनमध्ये परतले आहेत. मागील २४ दिवसांपासून न्यूझीलंडमध्ये एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. रुग्ण आढळल्यानंतर न्यूझीलंड सरकारने नागरिकांना इशारा दिला आहे.

न्यूझीलंडमध्ये करोनाबाधित रुग्ण न आढळल्यामुळे मागील आठवड्यात सर्वच निर्बंध मागे घेण्यात आले होते. करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळात आणखी करोनाबाधित रुग्ण आढळण्याची शक्यता असून परदेशात अडकलेले अनेक नागरिक मायदेशी परतत असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही करोनाबाधित रुग्ण ब्रिटनमधून परतले असून दोघांचाही परस्परांशी संबंध आहे. न्यूझीलंडमध्ये परदेशातून येणाऱ्या नागरिकांमार्फत करोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले. न्यूझीलंडमध्ये शेवटचा करोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर परदेशातून देशात येणाऱ्या नागरिकांमुळे करोना फैलावणार असल्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला होता.

 

जवळपास ५० लाख लोकसंख्या असलेल्या या देशात १५०४ जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यातील २२ जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूझीलंडने करोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवल्याबद्दल पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली. करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर न्यूझीलंड सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली. अखेर कठोर निर्बंधानंतर करोनाच्या संसर्गाला रोखण्यास यश मिळाले.

न्यूझीलंडमध्ये २६ फेब्रुवारी रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर मार्च महिन्यात इटली आणि स्पेनमध्ये वेगाने करोनाबाधितांची संख्या वाढत होती. त्याचवेळी न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यावेळी फक्त सहा रुग्ण होते. त्यानंतर १९ मार्च रोजी न्यूझीलंडबाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी जाहीर करण्यात आली. लॉकडाउनच्या नियमांचे नागरिकांनीही पालन केले. एका मंत्र्याने लॉकडाउनचे उल्लंघन केल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

Recent Posts