loader
Foto

वेगवान करोना चाचणी; एक मिनिटात होणार निदान!

जेरुसलेम: करोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. करोनाबाधितांना ओळखून त्यांच्या उपचार करण्याचे मोठे आव्हान अनेक देशांसमोर आहे. करोनाची चाचणी व त्याचे परिणाम झटपटपणे समोर यावे यासाठी टेस्ट किटवरही संशोधन सुरू आहे. इस्रायलच्या संशोधकांनी अवघ्या एका मिनिटांत करोनाचे निदान करता येईल असे टेस्ट किट विकसित केल्याचा दावा केला आहे.

इस्रायलच्या बेन-गुरियन विद्यापीठातील संशोधक प्रा. गॅबी सरूसी यांनी हे टेस्ट किट विकसित केले आहे. संशोधकांनी निर्मिती केलेल्या इलेक्ट्रो-ऑप्टिकल करोना टेस्टमध्ये किट नाक, घसा आणि फुंक मारून नमुने जमा केले जात आहे. ही चाचणी करोनाबाधितांमधील संक्रमणाची चाचणी करू शकत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या किट मध्ये असलेल्या एका खास सेन्सरमुळे करोनाचे निदान करता येणे शक्य असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. नमुने घेताना फुंक मारल्यानंतर त्यातील काही कण सेन्सरपर्यंत जातात. त्यातून करोनाचे निदान करता येते. हे सेन्सर खास करोनाच्या चाचणीसाठी विकसित करण्यात आले आहे. या टेस्ट किटने आतापर्यंत ९० टक्के अचूक निदान केले आहेत.

ही चाचणी स्वस्त दरात होणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. एका चाचणीसाठी ४० ते ५० डॉलरचा खर्च येऊ शकतो. सार्वजनिक ठिकाणी, विमानतळ, गर्दीच्या ठिकाणी ही चाचणी किट उपयुक्त ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित शासकीय परवानगी मिळाल्यानंतर लवकरच या किट्सची निर्मिती करण्यात येणार आहे.

Recent Posts